मुंबई : आपण भारतात कधी परत येऊ हे सांगू शकत नाही, असे फरारी आर्थिक गुन्हेगार (एफईओ) आणि मद्यसम्राट विजय मल्या याच्यातर्फे गुरुवारी उच्च न्यायालयात सांगण्यात आले.

भारतात येऊन कायद्याच्या वैधतेला आव्हान देणारे प्रकरण चालवावे, असे नमूद करून भारतात येणार की नाही हे स्पष्ट करण्यासाठी न्यायालयाने मल्या याला मागील सुनावणीच्या वेळी शेवटची संधी दिली होती. त्या पार्श्वभूमीवर मल्या याच्या याचिकेवर गुरुवारी सुनावणी झाली. त्यावेळी, इंग्लंड आणि वेल्स सोडण्याची किंवा तसा प्रयत्न करण्याची अथवा कोणत्याही आंतरराष्ट्रीय प्रवास दस्तऐवजासाठी अर्ज करण्याची आपल्याला परवानगी नाही, ते स्वतःकडे ठेवण्याची आपल्याला परवानगी नाही. त्यामुळे, भारतात कधी परत येऊ हे स्पष्टपणे सांगू शकत नाहीत, असे मल्या याच्यातर्फे न्यायालयाला सांगण्यात आले.

दरम्यान, मल्या हा त्याच्याविरोधात सुरू केलेल्या कार्यवाहीपासून पळ काढून दिलासा मागू शकत नाही, असेही मुख्य न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखालीला खंडपीठाने मल्या याला उपरोक्त भूमिका स्पष्ट करण्याचा इशारा देताना स्पष्ट केले होते. मल्या हा परत येण्यास इच्छुक नाही असे प्रतिज्ञापत्राद्वारे स्पष्ट करू शकतो. परंतु, त्यला फरारी आर्थिक गुन्हेगार कायद्याला आव्हान द्यायचे असल्यास भारतीय न्यायक्षेत्रात यावेच लागेल, असेही न्यायालयाने मल्याला भारतात परत येणार की नाही याबाबत भूमिका स्पष्ट करण्याची शेवटची संधी देताना स्पष्ट केले.