मुंबई: मुंबई सह महानगर प्रदेशात गेल्या दोन दिवसापासून होत असलेल्या अतिवृष्टी आणि वादळामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून पालिकेचे यंत्रणा सपशेल अपयशी ठरली आहे. अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून त्याचे तीव्र पडसाद सोमवारी विधानसभेत उमटले विधानसभेचे कामकाज सुरू होताच काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांच्यासह विरोधी पक्षातील सदस्यांनी राज्यात पावसामुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीची साधनाला माहिती देत आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यात पालिका अपयशी ठरल्या असून सरकारने हस्तक्षेप करण्याची मागणी केली.
मुंबईसह महाराष्ट्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक दुर्दैवी घटना घडल्या असून निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागत आहे. मुंबईत मॅनहोलमध्ये पडून, झाड कोसळून तसेच मानखुर्द येथील इमारत कोसळून अनेक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत गेल्या दोन दिवसांत १२ जणांचा जीव गेला आहे.अशी माहिती काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी सभागृहात दिली.
या सर्व घटनांमुळे प्रशासनाच्या तयारीवर आणि आपत्ती व्यवस्थापनावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पावसाळ्यापूर्वी धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण, झाडांची छाटणी, मॅनहोलची सुरक्षितता, जलनिस्सारण व्यवस्था आणि आपत्कालीन नियोजन प्रभावीपणे झाले असते, तर अनेक नागरिकांचे प्राण वाचले असते.या दुर्घटनांमागील निष्काळजीपणाची जबाबदारी निश्चित झाली पाहिजे.
मुंबई–पुणे मार्गावरील मिसिंग लिंक परिसरात दरड कोसळल्याने द्रुतगती मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. यापूर्वी याच प्रकल्पात खड्ड्यांचा प्रश्न समोर आला होता. आता दरड कोसळल्याने द्रुतगती मार्ग, जुना मुंबई–पुणे महामार्ग आणि घाट विभागातील रेल्वे वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. हजारो प्रवासी अडकून पडले असून नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे, अस वडेट्टीवार म्हणाले.
राज्य सरकारने या संपूर्ण परिस्थितीबाबत तातडीने अधिकृत निवेदन करून नागरिकांना वस्तुस्थिती, उपाययोजना आणि पुढील नियोजनाची माहिती द्यावी. तसेच या सर्व दुर्घटनांची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित विभागातील अधिकाऱ्यांची व यंत्रणांची जबाबदारी निश्चित करावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली. तर अमिन पटेल यांनी मुंबई महापालिका आपत्कालीन परिस्थिती आढळण्यात पूर्णपणे अपयशी ठरली आहे अशीच परिस्थिती महानगर प्रदेशातील अन्य महापालिका क्षेत्रात निर्माण झाली असून राज्य सरकारने मुंबईसह महानगर प्रदेशात त्वरित आणीबाणी जाहीर करून हस्तक्षेप करावा अशी मागणी केली. तर अजय चौधरी यांनी मुंबईत मोठ्या प्रमाणात झाडे पडली, मृत्यू झाले, सिमेंट रोडला तडे पडले आहेत त्याची चौकशी करा अशी मागणी केली.
राज्यातील परिस्थिती ही निसर्गचक्रातील बदलामुळे निर्माण झाले असून महापालिका तसेच प्रशासनाने मान्सूनपूर्व तयारी केली होती मात्र निसर्गचक्रातील बदलामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. त्यावर राज्यातील अतिवृष्टीची स्थिती पाहता सगळ्यांचे सहकार्य हवे, सतर्क रहावे , आजची स्थिती बघून आजचं कामकाज स्थगित करण्याची घोषणा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली.
