मुंबई: राज्यातील जनता गॅस सिलिंडरसाठी तासनतास रांगेत उभी आहे. हायवेवरील हॉटेल्स बंद पडली आहेत. काँग्रेस कार्यालयाबाहेरील हॉटेल्सही ओस पडली आहेत, पण सत्ताधाऱ्यांची बनवाबनवी अजूनही सुरूच असून ही इंधन टंचाई पंडित जवाहरलाल नेहरू किंवा इंदिरा गांधींमुळेच झाली असेल, असा उपरोधिक टोला काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपला लगावला.
इराण-इस्रायल युद्धामुळे इंधन टंचाई निर्माण झाली असताना भाजपने या स्थितीवरून विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना लक्ष्य केले. याला वडेट्टीवार यांनी प्रत्युत्तर दिले. हा गॅस – पेट्रोल तुडवडा पंडित नेहरूंमुळेच झाला असेल! गॅस सिलेंडरसाठी जनता तासन् तास रांगेत उभी आहे, हायवेवरची हॉटेलं बंद पडली आहेत, काँग्रेस कार्यालय बाहेरील हॉटेल बंद आहेत पण सत्ताधाऱ्यांची ‘बनवाबनवी’ अजूनही सुरूच आहे. स्वतःच्या चुकांचे खापर दुसऱ्यांवर फोडताना भाजपला लाज वाटत नाही. पाप तुमचे आणि खापर काँग्रेसवर? राहुल गांधीचे नाव भाजपला घ्यायचे असेल तर हा तुटवडा पण पंडित नेहरू, इंदिराजी गांधी यांच्यामुळेच झाला,भाजपची ही जुनी टेप आहे. लोकांच्या चुली विझवून कसले नवीन जुमले देत आहेत? जनतेच्या संयमाचा अंत पाहू नका, उत्तरे द्या, असे वडेट्टीवार म्हणाले.
तर महाराष्ट्राचा मंत्री शहीद झाला असता
विजय वडेट्टीवार यांनी यावेळी सातारा जिल्ह्यात मंत्री शंभूराज देसाई व पोलिसांत झालेल्या कथित झटापटीवरही भाष्य केले. या घटनेला त्यांनी थेट भाजपला जबाबदार धरले. राज्याचे गृहखाते झोपलेय की जाणीवपूर्वक डोळेझाक करतेय? साताऱ्यात मंत्र्यावर हल्ला झाला. तेव्हा सीसीटीव्ही बंद होते. हा पुराव्यांची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न आहे. हा पूर्वनियोजित कट नाही तर काय? हे राज्य सुरक्षित आहे का? मंत्र्यावर हल्ला होतो, सीसीटीव्ही बंद असतात, पुरावे नष्ट केले जातात. हे सर्व कोणाच्या इशाऱ्यावर घडतेय याचे उत्तर जनतेला हवेय. हे घडवायचे होते म्हणून तिथे पीओपीचे काम काढले आणि पीओपीचे काम काढले म्हणून सीसीटीव्ही कॅमेरे बंद पडले. ही वस्तुस्थिती आहे. ते अर्धवट सांगत आहेत. ते पुरावे सापडू नये म्हणूनच प्रयत्न करत आहेत. तो मंत्री (शंभूराज देसाई) अगोदरच फार बारीक किरकोळ आहे. त्याला थोडे बसले. अधिक बसले असते तर महाराष्ट्राचा मंत्री शहीद झाला असता, अशीही टीका त्यांनी केली.
