मुंबई : कानातील सोन्याच्या बाळींसाठी दोघांनी एका चार वर्षांच्या मुलाचे अपहरण केल्याची घटना दोन दिवसांपूर्वी विक्रोळी परिसरात घडली. या प्रकरणी विक्रोळी पोलिसांनी तपास करून दोन आरोपींना अटक केली. दोन्ही आरोपी विक्रोळी परिसरातील असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

विक्रोळी परिसरात राहणारा पीडित चार वर्षांचा मुलगा बुधवारी सकाळी ११ च्या सुमारास परिसरातील दुकानात बिस्कीट घेण्यासाठी गेला होता. याच वेळी दोन अनोळखी व्यक्तींनी मुलाला खाऊचे अमिष दाखवून त्याचे अपहरण केले. आरोपींनी मुलाला एका मोठ्या नाल्याजवळील निर्जन ठिकाणी नेले आणि त्याच्या कानातील ५० हजार रुपये किमतीच्या दोन बाळी काढून घेतल्या. त्यानंतर मुलाला तेथेच सोडून आरोपींनी पोबारा केला.

आरोपींनी बाळी काढल्यानंतर मुलाच्या कानाला मोठी दुखापत झाली होती. त्यामुळे तो रडत घरी आला. यावेळी कुटुंबीयांनी त्याच्याकडे चौकशी केली असता, त्याने घडलेला प्रकार सांगितला. कुटुंबीयांनी तत्काळ विक्रोळी पोलिस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दाखल केली. पोलिसांनी अपहरण आणि जबरी चोरीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.

विक्रोळी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूर्यकांत नायकवडी यांनी या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी एक पथक तयार केले. पथकाने मुलाकडे अधिक चौकशी केली असता त्याने पोलिसांना आरोपींचे वर्णन सांगितले. त्यावरून आणि परिसरातील सीसी टीव्ही कॅमेऱ्यांतील चित्रणाच्या साह्याने पोलिसांनी तपास करून दोन्ही आरोपींना गुरुवारी रात्री विक्रोळी परिसरातून अटक केली. बशीर शेख (२५) आणि अरबाज पठाण (२४) अशी अटक आरोपींची नावे असून दोघेही विक्रोळी परिसरतील रहिवासी आहेत. त्यांनी चोरलेले सोन्याचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले असून या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.