मुंबई: महापालिकेच्या आरोग्य विभागात अधिकारी असल्याची बतावणी करून वडापाव विक्रेत्यांकडून पैसे उकळणाऱ्या एका तोतयाला विक्रोळी पोलिसांनी अटक केली. विजय गावडे (६२) असे या आरोपीचे नाव असून या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

विक्रोळीमधील हरियाली व्हिलेज परिसरात मुरली प्रसाद गुप्ता यांचा वडापाव विक्रीचा व्यवसाय आहे. महिन्याभरापूर्वी आरोपी त्यांच्या वडापाव विक्रीच्या गाडीवर आला होता. आपण महापालिकेच्या आरोग्य विभागातून आलो असून त्याने गुप्ता यांच्याकडे परवान्याची मागणी केली. गुप्ता यांच्याकडे परवाना नसल्याने आरोपीने त्यांच्याकडे पाच हजार रुपये दंडाची मागणी केली. तडजोड करून आरोपीने त्यांच्याकडून आठशे रुपये घेतले आणि पळ काढला. दरम्यानच्या काळात आरोपीने या परिसरातील अनेक स्टॉलधारकांकडून पैसे उकळल्याचे उघडकीस आले.

आरोपी शुक्रवारी पुन्हा या परिसरात आला. यावेळी त्याने अनेकांकडे पैसे मागितले. मात्र काही स्टॉलधारकांना त्याच्यावर संशय आल्याने त्यांनी ही बाब विक्रोळी पोलिसांना सांगितली. पोलिसांनी तात्काळ त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली. चौकशीत आरोपी तोतया अधिकारी असल्याचे समोर आले. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.