मुंबई: विक्रोळीमधील टागोर नगर परिसरातील एका घरात शुक्रवारी विक्रोळी पोलिसांना एका व्यक्तीचा मृतदेह आढळला. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने या व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे प्रथमिक तपासात समोर आले असून या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

शशिकांत बनसोडे (५५) असे मृत व्यक्तीचे नाव असून ते टागोर नगर येथील स्नेहसागर सोसायटी वास्तव्यास होते. काही महिन्यांपासून ते एकटेच राहात होते. दारूच्या व्यसनामुळे ते फारसे घराबाहेर पडत नव्हते. घरातून दुर्गंधी येऊ लागल्याने याबाबत स्थानिक रहिवाशांनी विक्रोळी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. मात्र दरवाजा आतून बंद असल्याने पोलिसांनी अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण केले.

अग्निशमन दलाच्या जवानांनी दरवाज तोडून घरात प्रवेश केला. बनसोडे यांना तात्काळ महापालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. डोक्याला दुखापत झाल्यामुळे बनसोडे यांचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले. बनसोडे यांच्या मृत्यूबाबत कुटुंबियांना कुणावरही संशय नसल्याने पोलिसांनी अपमृत्यूची नोंद करत तपास सुरू केला आहे.