ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी अभिनेत्री कंगना रणौतच्या भारताला स्वातंत्र्य भीक म्हणून मिळाल्याच्या वक्तव्याचं समर्थन केलं. यानंतर देशभरातून विक्रम गोखलेंवर सडकून टीका झाली. सोशल मीडियावरही त्यांचं मोठ्या प्रमाणात ट्रोलिंग झालं. यावर आता विक्रम गोखले यांची नवी प्रतिक्रिया समोर आलीय. यात त्यांनी मी कंगनाला ओळखत नाही आणि कधीच सोबत काम केलं नाही. कंगना जे म्हटली ते खरं आहे, असं मत व्यक्त केलंय. तसेच १९ नोव्हेंबर रोजी माझ्यावरील सर्व टीकेला पुराव्यांसह उत्तर देईल, असंही नमूद केलंय. ते ‘न्यूज जे’ या वेबपोर्टलच्या मुलाखतीत बोलत होते.

विक्रम गोखले म्हणाले, “माझं त्या दिवशीचं भाषण तुम्ही ऐकलंय का, मी कंगना रणौतला ओळखत देखील नाही. माझी आणि तिची ओळख नाही आणि कधीच सोबत काम केलेलं नाही. माझ्याविषयी जे काही लिहून आलंय त्याचं उत्तर मी १९ तारखेला देणार आहे. त्या दिवशी मलाही कुणीही प्रश्न विचारणार नाही. कंगना जे म्हटली ते खरं आहे. प्रत्येक न्यूज चॅनल आणि पत्रकार मी पुराव्यांसह काय म्हणतोय ते ऐकतच राहील.”

“मला आई बहिणीवरून शिव्या देण्यात आल्या, चप्पल मारण्याची भाषा असं सर्व चुकीचं मी सहन करतोय. मी या क्षणी खूप वेगवेगळ्या पातळ्यावर लढतो आहे. आता मला रडू येतंय,” असंही विक्रम गोखले यांनी म्हटलंय.

हेही वाचा : स्वातंत्र्याची भीक मिळाल्याच्या कंगनाच्या वक्तव्याचं ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखलेंकडून समर्थन; म्हणाले…

सध्या विक्रम गोखले यांच्या मुलाखतीचा केवळ ट्रेलरच समोर आलाय. त्यामुळे या मुलाखतीतच त्यांची सविस्तरपणे भूमिका समजून घेता येणार आहे. मात्र, त्यांनी सांगितल्याप्रमाणे १९ नोव्हेंबरच्या पत्रकार परिषदेत विक्रम गोखले कोणते पुरावे दाखवतात आणि काय नवे वक्तव्यं करतात याकडे अनेकांचं लक्ष आहे.

विक्रम गोखले काय म्हणाले होते?

विक्रम गोखले म्हणाले, “खरंय, कंगना रणौत जे म्हणालेली आहे, ते की ते भीक मागूनच मिळालेलं आहे यावर मी सहमत आहे. हे दिलेलं गेलं आहे बरं का. हे ज्या योद्ध्यांनी मिळवण्याचा प्रयत्न केला त्या योद्ध्यांना फाशी जाताना मोठमोठे लोक बघत राहिले. त्यांना वाचवलं नाही त्यांनी. आपल्या देशाचे हे लोक ब्रिटिशांविरुद्ध उभे राहत आहेत, हे बघून सुद्धा त्यांना फाशीपासून वाचवलं नाही, असेही लोक केंद्रीय राजकारणात होते. भरपूर वाचलेलं आहे मी.”