महाराष्ट्रातील, आणि म्हणून अर्थातच या देशातील, गुणवंतांची संख्या पाहिली की कोणाचीही खरे तर दातखिळीच बसावी. मंगळवारी जाहीर झालेले दहावीचे निकाल ही दातखिळीची वार्षिक संधीच. एकूण परीक्षेला बसलेल्यांपैकी जवळपास ८८ टक्के उत्तीर्ण होतात काय आणि त्यातील काही तर ९८ वा अधिक टक्केही मिळवतात काय. सारेच थक्क करणारे. खरे तर तसे पाहू गेल्यास कोणालाही अभिमानच वाटायला हवा अशी ही स्थिती; परंतु प्रत्यक्षात मात्र या इतक्या प्रचंड शिक्षित तरुणांच्या तांडय़ाकडे पाहिले असता कोणाही विचारी जनांच्या मनी काळजीच दाटून यावी, असे स्पष्ट मत ‘उत्तीर्णाची उरस्फोड’ या अग्रलेखात मांडण्यात आले आहे. या अग्रलेखावर आपली भूमिका मांडत महागाव येथील ‘संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालया’चा विद्यार्थी विक्रम सावंत हा ‘ब्लॉग बेंचर्स’च्या पहिल्या पारितोषिकाचा मानकरी ठरला आहे. या स्पर्धेत नागपूरच्या ‘रायसोनी महाविद्यालयाचा’ विद्यार्थी विजय देशमुख याने दुसरे पारितोषिक पटकावले.

अग्रलेखावर मत मांडणाऱ्या विक्रम आणि विजय यांनी दर्जेदार लेखन करत ‘ब्लॉग बेंचर्स’ स्पर्धेत बाजी मारली. विक्रमला सात हजार आणि प्रमाणपत्र तर विजयला पाच हजार रुपये आणि प्रमाणपत्र असे बक्षीस देण्यात येणार आहे. या विद्यार्थ्यांना त्यांच्या महाविद्यालयांच्या प्राचार्याच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात येईल. या अग्रलेखावर व्यक्त होताना राज्यभरातील अनेक महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी आपल्या विचारांना चालना देत उत्तम लेखन केले.

महाविद्यालयीन युवा शक्तीच्या लेखणीला व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने सुरू केलेल्या या स्पर्धेला विद्यार्थी भरभरून प्रतिसाद देत आहेत. यात प्रत्येक आठवडय़ाच्या शुक्रवारी ‘आठवडय़ाचे संपादकीय’ या शीर्षकाखाली नवीन लेख प्रसिद्ध करण्यात येतो. त्यावर विद्यार्थ्यांना व्यक्त व्हायचे असते. त्यांना पुढील आठवडय़ाच्या गुरुवापर्यंतची मुदत दिली जाते.

विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या लेखांचे परीक्षण तज्ज्ञ परीक्षकांकडून केले जाते. पहिल्याच लेखापासून या स्पर्धेला विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. या स्पर्धेत सहभागी होऊ  इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना indianexpress-loksatta.go-vip.net/Blogbenchers या संकेतस्थळाला भेट देऊन आपली भूमिका मांडायची आहे.