ओटीटी माध्यम आणि रुपेरी पडदा दोन्हीकडे आपले चित्रपट गाजत असताना आपण चित्रपटसृष्टीतून काही काळ निवृत्ती घेत असल्याचे अभिनेता विक्रांत मस्सी याने जाहीर केले. आणि चित्रपटसृष्टीसह सगळीकडे एकच चर्चा सुरू झाली. उलटसुलट रंगणाऱ्या या चर्चांनंतर मी निवृत्ती नव्हे तर काही महिन्यांसाठी विश्रांती घेतली आहे, असेही त्याने स्पष्ट केले. या मुद्द्यावर ‘लोकसत्ता’शी बोलताना केवळ कलाकारांनाच नव्हे तर आजच्या धकाधकीच्या जीवनातून सर्वसामान्यांनीही स्वत:साठी आणि कुटुंबासाठी वेळ देणे आवश्यक आहे, असे मत विक्रांतने व्यक्त केले.
विक्रांत सध्या ‘आँखों की गुस्ताखियां’ या हिंदी चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. नव्या काळातील प्रेमाचा आनंद लुटत आणि गुंतागुंतीच्या समस्यांतून मार्गक्रमण करत फुलणारी एका दृष्टिहीन तरुण जोडप्याची प्रेमकथा या चित्रपटात मांडण्यात आली आहे. हा चित्रपट येत्या ११ जुलै रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे. विविध चित्रपटांतून लक्षवेधी भूमिका साकारणारा अभिनेता विक्रांत मस्सी आणि अभिनेत्री शनाया कपूर हे या चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहेत.
यानिमित्ताने, विक्रांत याने संवाद साधत विविध विषयांवर भाष्य केले. सध्याच्या धावपळीच्या जगात सर्वसामान्य नागरिकांपासून कलाकारांपर्यंत सर्वचजण धकाधकीचे जीवन जगत आहेत. यामुळे एकमेकांसोबत राहूनही संवाद हरवत चालला आहे, माणसेही दुरावत चालली आहेत. अनेकदा ताणतणावाखाली येऊन काहीजण टोकाचे निर्णय घेतात. याअनुषंगाने बोलताना, आयुष्याच्या प्रवासात माणसाने व्यग्र वेळापत्रकातून काही काळ विश्रांती घेऊन स्वत:साठी वेळ देणे अत्यंत आवश्यक आहे. या काळात स्वत:ला वेळ देता येतो, नवी उमेद मिळते. त्यामुळे मी मनोरंजनसृष्टीतून कधीच निवृत्ती घेतली नव्हती. फक्त काही काळ विश्रांती घेतली होती, असे विक्रांतने स्पष्ट केले.
मी मनोरंजनसृष्टीतून निवृत्ती घेतल्याची अफवा पसरविण्यात आली. मी फक्त सहा महिन्यांची विश्रांती घेतली होती. या काळात स्वत:ला वेळ देता आला आणि त्यामुळे स्वत:बद्दल अनेक गोष्टी नव्याने उमगल्या. विशेष बाब म्हणजे माझ्या आयुष्यात जे खंबीरपणे उभे आहेत, त्या माझ्या कुटुंबीयांसोबत आनंदाने वेळ घालवता आला. अशा पद्धतीने प्रत्येकानेच स्वत:ला वेळ दिला पाहिजे, त्यामुळे तुम्हाला मन:शांती मिळते आणि विविध गोष्टींबद्दलचा तुमचा दृष्टिकोन स्पष्ट होतो’, असेही त्याने सांगितले.
झी स्टुडिओज आणि मिनी फिल्म्स प्रस्तुत ‘आँखों की गुस्ताखियां’ या चित्रपटात विक्रांत आणि शनाया कपूर मध्यवर्ती भूमिकेत आहेत. शनायानेसुद्धा एका दृष्टिहीन तरुणीची भूमिका केली आहे. या भूमिकेसाठी तिनेही प्रचंड मेहनत घेतली असून उत्तमरीत्या काम केले आहे, असे विक्रांतने सांगितले. ‘शनाया आणि माझे पात्र दृष्टिहीन असल्यामुळे दोघांमध्ये व्यवस्थित समन्वय साधणे आवश्यक होते, या अनुषंगाने आम्ही तयारी केली. या संपूर्ण प्रक्रियेतून खूप काही शिकता आले, हा अनुभव विलक्षण होता’, अशी भावना त्याने व्यक्त केली.
सध्या ओटीटी माध्यमांमुळे देशासह जगभरातील विविध भाषांतील कलाकृती एकाच ठिकाणी पाहायला मिळत आहेत. यामुळे निरनिराळ्या आशयांवर आधारित चित्रपट व वेबमालिकांना पसंती मिळते आहे. परिणामी मनोरंजनासंबंधित प्रेक्षकांची आवडही वैविध्यपूर्ण होत आहे. साचेबद्ध विषयांच्या पलीकडच्या कथा प्रेक्षकांना आवडत असून येत्या काळात हीच गोष्ट हिंदी चित्रपटसृष्टीसाठी जमेची बाजू ठरण्याची शक्यता आहे, असे निरीक्षण विक्रांतने नोंदवले. ‘आँखों की गुस्ताखियां’ या चित्रपटातूनही एक वेगळी प्रेमकथा अनुभवायला मिळणार आहे. मानसी बागला यांनी प्रत्येक गोष्टीचा बारकाईने विचार करून उत्तम लेखन केले असल्याचे त्याने सांगितले.
सन्मानाने पाहायला हवे
अंध व्यक्तीच्या भूमिकेमुळे माझा एकूणच जगण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. या भूमिका माणूस म्हणूनही आपल्याला बदलून टाकतात. एक गोष्ट लक्षात आली की, मनात जिद्द असली की कोणतीही गोष्ट साध्य करता येते. ज्या व्यक्तींमध्ये शारीरिकदृष्ट्या काही कमतरता असतात, त्या व्यक्तींमध्ये विविध कौशल्ये असतात आणि अशा व्यक्ती मेहनत करून आपला उदरनिर्वाह चालवत असतात. अशा विशेष व्यक्तींकडे आपण दयेच्या भावनेतून न पाहता सन्मानाने पाहायला हवे, असे स्पष्ट मत त्याने व्यक्त केले.
विशिष्ट ‘लेन्स’, अंधार आणि आव्हाने…
मी ‘आँखों की गुस्ताखियां’ या चित्रपटात एका दृष्टिहीन संगीतकाराची भूमिका केली आहे. ही एक आव्हानात्मक भूमिका असल्यामुळे मानसिक तसेच शारीरिक, अशा दोन्ही स्तरांवर तयारी करावी लागली. या प्रवासात विविध आव्हानांचा सामना करावा लागला. या भूमिकेसाठी एका विशिष्ट प्रकारची ‘लेन्स’ लावून सराव आणि त्यानंतर आम्ही चित्रीकरण केले. या लेन्स डोळ्यांवर लावल्यानंतर जवळपास ८० ते ९० टक्के दृष्टी कमी होते आणि डोळ्यांसमोर अंधार पसरतो. परिणामी, आपसूकच तुमची देहबोली बदलते. या विशिष्ट लेन्स लावल्यानंतर डोळ्यांसमोर अंधार होता, त्यामुळे सदर पात्रासाठी आवश्यक देहबोली आणि हावभाव प्रभावीपणे मांडण्यासाठी विशेष मेहनत घ्यावी लागली. सेटवरील प्रकाशयोजना, विविध वस्तू आणि इतर अडथळ्यांचा अंदाज घेऊन तसेच सुरक्षितता बाळगून काम केले. त्यामुळे एकूणच ही भूमिका साकारतानाची प्रक्रिया आव्हानात्मक असली, तरी खूप काही शिकविणारी आणि जगण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलवणारी होती, अशी भावना विक्रांत याने व्यक्त केली.