भाजपविरुध्द बंड करुन खेड मतदारसंघात युतीच्या उमेदवाराविरुद्ध विधानसभा निवडणूक लढविलेले माजी आमदार डॉ. विनय नातू लवकरच स्वगृही परतण्याची चिन्हे आहेत. पक्षापासून दुरावलेल्या नाराजांना स्वगृही आणण्यासाठी आणि काँग्रेस-राष्ट्रवादी विरोधकांना एकत्र आणण्यासाठी भाजपने प्रयत्न सुरु केल्याने आता लवकरच नातूंचा पक्षप्रवेश होईल. नवीन प्रदेश पदाधिकारी नियुक्त करताना भाजपने कोकणावर अन्याय केली असून नातूंचा समावेश झाल्यावर त्यांची सरचिटणीस किंवा उपाध्यक्षपदी नियुक्ती होण्याची शक्यता आहे.  शिवसेनेचे रामदास कदम यांच्यासाठी मतदारसंघाची मागणी करण्यात आल्यावर भाजपने विनय नातूंचे तिकीट गेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी कापले. त्यामुळे बंड करुन नातू अपक्ष म्हणून उभे राहिले. त्यामुळे नातू व कदम दोघेही पराभूत झाले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे भास्कर जाधव यांचा विजय झाला. आता ही चूक सुधारण्यासाठी नातू यांना पुन्हा पक्षात घेतले जाणार आहे, असे सूत्रांनी सांगितले. आगामी निवडणुकीच्या वेळी नातूंना पुन्हा उमेदवारीही देण्याचेही आश्वासन दिले जाणार आहे.