मुंबई ट्वेन्टी ट्वेन्टी लीग सामन्यांच्या पारितोषिक वितरण सोहळ्या दरम्यान भारतीय क्रिकेट चाहत्यांना एक सुखद चित्र दिसलं. एकेकाळचे जिवाभावाचे मित्र असणा-या सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळीमधील दुरावा कमी झाल्याचं स्पष्ट झालं. कारण पारितोषिक घेताना विनोद कांबळी चक्क सचिनच्या पाया पडला आणि सचिननेही त्याला लगेच उचलून अलिंगन दिलं.

या लीगमधील अंतिम सामन्यात ट्रायम्फ नाईट्स संघाने शिवाजी पार्क लायन्सवर तीन धावांनी मात केली. त्यानंतर शिवाजी पार्क लायन्स या उपविजेत्या संघाचा मेण्टॉर या नात्यानं विनोद कांबळी पदक स्वीकारण्यासाठी व्यासपीठावर आला. त्यावेळी सुनील गावस्कर यांनी सचिन तेंडुलकर ते पदक कांबळीच्या गळ्यात घालेल अशी तजवीज केली होती. सचिनकडून पारितोषिक स्वीकारताच विनोदनं पटकन खाली वाकून त्याला नमस्कार केला.

मग सचिननं विनोदला वर उठवून आलिंगन दिलं. दोन जुन्या दोस्तांमधलं ते प्रेम मुंबईच्या क्रिकेटरसिकांना सुखावणारं होतं. कांबळी असं काही करेल हे सचिनला अर्थातच अनपेक्षित होतं. त्यामुळे स्वतःला सावरत लगेचच सचिनने विनोदला उठवलं आणि गळाभेट घेतली.

का होता दुरावा –
विनोद कांबळीने जुलै 2009 मध्ये एका टीव्ही शो दरम्यान क्रिकेटमध्ये पुनरागमनासाठी सचिनने मदत केली नाही, असा आरोप केला होता. त्यानंतर दोघांमध्ये दुरावा आला होता.