मराठी भाषा दिनापूर्वी मराठी भाषेला अभिजित भाषेचा दर्जा मिळण्याचा मुहूर्त अखेर टळला आहे. शुक्रवारी (२७ फेब्रुवारी २०१५) मराठी भाषा दिन साजरा होत आहे. दरम्यान हा मुहूर्त हुकला असला तरी येत्या महिनाभरात यावर निर्णय होईल, असे राज्याचे मराठी भाषा व सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.  
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा बहाल करण्याची शिफारस साहित्य अकादमीच्या भाषातज्ज्ञ समितीने केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाकडे काही दिवसांपूर्वी केली होती. केंद्रीय सांस्कृतिक मंत्री डॉ. महेश शर्मा यांनी याबाबतची माहिती तावडे यांना दिली होती. त्यामुळे मराठी भाषा दिनापूर्वी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळेल, असा विश्वास विनोद तावडे यांनी व्यक्त केला होता.   
याबाबत तावडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले, भाषा तज्ज्ञ समितीने या विषयासाठी ८० कोटी रुपयांची तरतूद करण्याची शिफारस केली आहे. अर्थसंकल्पाच्या घाईगर्दीत ही तरतूद करणे शक्य झालेले नाही. येत्या महिनाभरात ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल आणि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळेल.