मुंबई : विन्टेज अँड क्लासिक कार क्लब ऑफ इंडियाच्या (व्हीसीसीसीआय) वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘विन्टेज कार फिस्टा ड्राइव्ह’चे आयोजन करण्यात आले आहे. कफ परेड येथील वल्र्ड ट्रेड सेंटरजवळ रविवार, १० एप्रिल रोजी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून देशभरातील विविध दुर्मीळ कार आणि मोटारसायकल यात सहभागी होणार आहेत.

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (एमटीडीसी) हा कार्यक्रम आयोजित केला असून पर्यटन व पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन होणार असून परिवहनमंत्री अनिल परब या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

सकाळी ९.३० वाजता पहिल्या कारला झेंडा दाखवण्यात येणार असून मंत्रालय- नरिमन पॉइंट- चौपाटी- बाबुलनाथ- पेडर रोड- हाजी अली- वरळी सीफेस- सागरी सेतू या मार्गावर जाऊन या कार परतणार आहेत.  १९०४ पासूनच्या दुर्मीळ कार, मोटारसायकल या कार्यक्रमात सहभागी होणार असून रोल्स राइस, बेन्टले, फोर्ड, पॅकर्ड आदी कंपन्यांच्या कार या कार्यक्रमात सहभागी होणार आहे. बक्षीस वितरणाचा कार्यक्रम वल्र्ड ट्रेड सेंटर येथे सकाळी ११.३० वाजता होणार आहे.