मुंबई :  आरोपींना अटक करण्यापूर्वी अटकेची कारणे तपास यंत्रणेकडून सांगणे अपेक्षित असताना क्रुझवरील अमलीपदार्थ पार्टीप्रकरणी अटकेत असलेला अभिनेता शाहरूख खान याचा मुलगा आर्यन तसेच त्याच्यासह अटक करण्यात आलेला अरबाज र्मचट आणि मॉडेल मुनमुन धमेचा यांना मात्र खरे व योग्य कारण न देताच अटक करून केंद्रीय अमलीपदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) त्यांच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन केल्याचा दावा तिघांच्या वतीने बुधवारी उच्च न्यायालयात करण्यात आला.

आर्यन, अरबाज आणि मुनमुन यांच्या जामीन याचिकेवर न्यायमूर्ती नितीन सांब्रे यांच्यासमोर सध्या सुनावणी सुरू आहे. आर्यनसह अन्य दोन आरोपींवर अटकेच्या वेळी केवळ अमलीपदार्थ बाळगणे आणि त्याचे सेवन केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. त्यांचा कटात सहभाग असल्याचे एनसीबीतर्फे सांगितले जात असले तरी त्यांच्यावर अद्याप अधिकृतरीत्या कटात सहभागी असल्याच आरोप ठेवण्यात आलेला नाही. त्यामुळेच त्यांच्यावरील सुरवातीचे आरोप लक्षात घेता अटक करण्याऐवजी केंद्रीय अमलीपदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) त्यांना नोटीस बजावणे गरजेचे होते असे आर्यनच्या वतीने देशाचे माजी महान्याय अभिकर्ता मुकुल रोहटगी, तसेच अरबाजच्या वतीने अ‍ॅड. अमित देसाई यांनी न्यायालयाला सांगितले.

अरबाजकडून सहा ग्रॅम चरस हस्तगत करण्यात आले. आर्यनकडे तेही सापडले नाही. शिवाय त्यांची वैद्यकीय चाचणीही करण्यात आलेली नाही असा युक्तिवाद करण्यात आला.

मग आर्यन आणि अन्य दोघांना जामीन का नाही ? आर्यन आणि अरबाज र्मचट यांच्याप्रमाणेच अमलीपदार्थाचे सेवन आणि ते बाळगल्याचा आरोप असलेल्या प्रकरणातील दोन आरोपींना जामीन दिला जातो. उलट त्यातील एकाकडून गांजा हस्तगत करण्यात आला, तर दुसरम्याने त्याचे सेवन केल्याचे मान्य केलेले असतानाही त्यांना जामीन मंजूर करण्यात आला. मग आर्यन आणि अरबाजला अटकेत का ठेवले जात आहे, असा प्रश्न देसाई यांनी उपस्थित केला. समानतेच्या नाही, तर स्वातंत्र्याच्या मुद्यावर आर्यन आणि अन्य दोघांना जामीन देण्याची मागणीही त्यांनी केली.