Viral Video Shahad Railway Station : मध्य रेल्वेच्या कल्याण रेल्वे स्थानकांजवळील शहाड आणि टिटवाळा रेल्वे स्थानकांचा रेल्वे प्रशासनाने मुंबई रेल्वे विकास मंडळाच्या माध्यमातून विकास केला. रेल्वेच्या अमृत योजनेतून ही कामे केली गेली. या कामांसाठी एकूण ३३ कोटींची तरतूद करण्यात आली. महत्त्वाचं म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते या रेल्वे स्थानकांचं लोकार्पण करण्यात आलं. पण येथील एक विदारक दृश्य आता समोर आलं आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होतोय.
शहाड रेल्वे स्थानकातील व्हिडिओ व्हायरल
सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय. या व्हिडिओ शहाड रेल्वे स्थानकातील असल्याचा दावा केला जातोय. या स्थानकात पावसाच्या वेळी छप्पर गळत असल्याने स्थानकाला धबधब्याचं स्वरुप प्राप्त झालं आहे. धो धो कोसळणाऱ्या पावसात आसरा मिळावा म्हणून प्रवासी रेल्वे स्थानकांवर उभे राहतात. मात्र, स्थानकातील छप्परच गळके असले तर प्रवाशांनाही त्याचा नाहक त्रास होतो.
या व्हिडिओवर अनेकांनी कॉमेट्सही केले आहेत. त्यानुसार, अशी परिस्थिती प्रत्येक स्थानकावर असल्याची तक्रार नेटिझन्सने केली आहे. बदलापूर, कल्याण, मीरा भाईंदर स्थानकातून प्रवास करणाऱ्या नेटिझन्सनेही अशी तक्रार केली आहे. त्यामुळे नागरिकांच्या करांतून स्थानकांचा विकास केला जात असताना त्यांना योग्य सुविधाही पुरवल्या जात नसल्याची तक्रार नेटिझन्सने केली.
हा व्हिडिओ रीलमिनिस्टर (रेल्वेमंत्री) आश्विनी वैष्णव यांनाही पाठवण्याचं आवाहन या द्वारे केलं गेलं आहे. पावसाळ्यात लोकल लेट होत असल्याने आधीच प्रवासी मेटाकुटीला आलेले असतात. त्यातच, अशा समस्यांना सामोरं जावं लागलं तर त्यांना पावसाळ्यात प्रवासच करावासा वाटणार नाही.
मध्य रेल्वेच्या अंतर्गत येणाऱ्या स्थानकांच्या पुनर्विकासाचे काम केवळ १५ महिन्यांत यशस्वीरित्या पूर्ण झाले. मध्य रेल्वेच्या अंतर्गत असलेल्या ८० स्थानकांपैकी १२ प्रमुख स्थानके समाविष्ट आहेत. १३८ कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या एकत्रित खर्चाने ही स्थानके आधुनिक प्रवासी-अनुकूल सुविधांनी विकसित करण्यात आली आहेत.