Virar Alibaug Multimodal Corridor Toll Rates: विरार ते अलिबाग हा १२८ किमीचा बहुउद्देशीय वाहतूक मार्गिका या महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) उभारण्यात येणाऱ्या प्रकल्पाच्या ३१ हजार ७९३ कोटी रुपये खर्चाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. प्रति किलोमीटरला ३ हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे. या महामार्गावरील देखभाल दुरुस्तीसाठी ४० वर्षे टोलवसुलीचे कंत्राट देण्यात येणार असून हलकी वाहने (जीप/कार) यांना ७६५ ते १००० रुपयांचा टोल भरावा लागणार आहे.

विरार – अलिबाग बहुउद्देशीय वाहतूक मार्गिका प्रकल्प आराखडा हा तयार करा, बांधा, निधी उभारा, वापरा आणि हस्तांतरित करा (डीबीएफओटी) या तत्त्वावर बांधण्यात येत आहे. बहुउद्देशीय वाहतूक मार्गासाठी सध्या भूसंपादनाचे काम सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीने या प्रकल्पाच्या रस्ते बांधणीसाठी प्रशासकीय मान्यता दिली आहे. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या संदर्भातील शासन निर्णय काढण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. राज्यातील आतापर्यंतच्या रस्ते प्रकल्पांपैकी हा सर्वात महागडा प्रकल्प ठरला आहे.

राज्य सरकारने यापूर्वीच मार्गिकेच्या भूसंपादनासाठी २२ हजार २५० कोटी आणि यावरील व्याजापोटी १४ हजार ७६३ कोटी अशा एकूण ३७ हजार ३ कोटी रुपयांच्या तरतुदीस मान्यता दिली आहे. महामंडळाने प्रकल्पाच्या २१ हजार ५३३ कोटीच्या प्रत्यक्ष बांधकाम किमतीला तांत्रिक मान्यता दिली आहे. मात्र, इतर आनुषंगिक तरतूद आणि जीएसटी मिळून प्रकल्पाची किंमत ३१ हजार ७९३ कोटी ४७ लाख रुपयांच्या घरात गेली आहे. प्रकल्प पूर्ण करण्यासाठी ३ वर्षाची कालमर्यादा घालून देण्यात आली आहे.

मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीने सरकारच्या पथकर धोरणातील तरतुदीनुसार चारचाकी वाहनांसाठी ७६५ रुपये टोल निश्चित केला आहे. बीओटीचा ४० वर्ष सवलतीचा कालावधी लक्षात घेता प्रकल्पासाठी ९.८५ टक्के म्हणजे ६ हजार २५९ कोटी ३२ लाख रुपये व्यवहार्यता तूट अनुदान (व्हिजीएफ) रक्कमेला मान्यता देण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या सार्वजनिक खासगी भागीदारी मूल्यांकन समितीसोबत समन्वय साधण्यासाठी आणि केंद्राकडून व्यवहार्यता तूट अनुदान मिळवण्यासाठी एमएसआरडीसीला नियोजन प्राधिकरण म्हणून नेमण्यात आले आहे.

मेट्रोही धावणार

या प्रकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे हा ८ पदरी महामार्ग उभारण्यात येत असून याच्या मधल्या भागात मेट्रोचे नियोजन करण्यात आले आहे. अशा प्रकारे रस्त्याच्या मधल्या भागातून मेट्रो धावणारा हा पहिला प्रकल्प आहे. दोन्ही बाजूंना चार पदरी रस्त्याच्या मधोमध मेट्रो मार्ग तयार करण्यात येणार आहे. यामुळे विरार-अलिबाग थेट मेट्रो प्रवासही करता येणार आहे.

मुंबई-पुणे द्रुतगती, समृद्धी महामार्गापेक्षा अधिक टोल

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग ९४.५ किमी लांबीचा महामार्ग असून सध्या यावर हलक्या वाहनांसाठी एकमार्गी ३२० ते ४९५ रुपये टोल आहे. तर मुंबई-नागपूर समृद्धी महमार्गावरील ७०१ किमीच्या टप्प्यासाठी १७१७ रुपये टोल आकारला जात आहे. त्या तुलनेत विरार-अलिबाग बहुद्देशीय महामार्गासाठी १२८ किमीसाठी प्रस्तावित टोलची रक्कम ही तुलनेत अधिक आहे.