मुंबई- लोकल ट्रेनच्या दारात उभे राहून जागा अडवणाऱ्या टोळक्यांच्या दादागिरीचा फटका एका पोलिसालाही बसला आहे. विरार चर्चगेट लोकलमध्ये या पोलिसाला चौघा प्रवाशांच्या टोळक्याने बेदम मारहाण केली आहे. या मारहाणीत या पोलिसाचा एक दातही तुटला आहे. याप्रकरणी रेल्वे पोलिसांनी एका प्रवाशाला अटक केली आहे.
२५ वर्षीय तक्रारदार हे मिरा भाईंदर वसई विरार पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई म्हणून कार्यरत आहेत. सरकारी कामानिमित्ताने ते सोमवारी सकाळी पुण्याला जाण्यासाठी निघाले होते. सकाळी साडेआठच्या सुमारास त्यांनी फलाट क्रमांक ४ वरून चर्चगेटला जाणारी अप लोकल पकडली होती. ते लोकल ट्रेनच्या सर्वसाधारण डब्यात चढले होते. त्यावेळी प्रवाशांचा एक गट दारात जागा अडवून उभा होता. तक्रारदार पोलीस साध्या कपड्यात होते. त्या गर्दीतून कसेबसे डब्यात चढले. पण त्यावेळी दारात उभे राहून जागा का अडवली? असा जाब त्यांनी त्या टोळक्याला विचारला. त्यावेळी झालेल्या वादातून चार प्रवाशांनी त्या पोलीस शिपायाला बेदम मारहाण केली. या मारहाणीत त्यांचा शर्ट फाटला आणि जबड्याला दुखापत होऊन एक दात तुटला. मी पोलीस आहे असे सांगत असूनही त्या चौघांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. नंतर अन्य प्रवाशांनी मध्यस्ती केल्यानंतर त्यांची सुटका झाली. या पोलीस शिपायाने आपल्या मोबाईल मधून मारहाण करणाऱ्या दोन प्रवाशांचे फोटो घेतले होते. मला भाईंदर पासून मिरा रोड स्थानक येईपर्यंत मला मारहाण करत होते. त्यामुळे माझं डोकं बधीर झालं होतं. मी मदतीसाठी रेल्वेच्या दोन्ही हेल्पलाईनवर फोन केला पण मदत मिळाली नाही, असे तक्रारदार पोलीस शिपायाने सांगितले.
टोळक्याला सापळा लावून पकडले
पूण्याहून परतल्यानंतर दुसऱ्या दिवशी मंगळवारी त्यांनी मारहाण करणाऱ्या प्रवाशाचा शोध घेण्याचे ठरवले. विरारहून येणाऱ्या प्रवाशांचे टोळके जागा अडवून इतर प्रवाशांना आत घेत नाही अशी माहिती त्यांना मिळाली. रेल्वे पोलिसांच्या मदतीने त्यांनी वसई रेल्वे स्थानकात सापळा लावला. त्यातील एक प्रवासी वसई स्थानकात दिसला. त्याला पकडून वसई रेल्वे पोलीस ठाण्यात आणले. त्याचे नाव केयुर गोसालिया (२४) असून तो वसईच्या साईनगर येथे राहतो. त्याने मारहाण करणाऱ्या आपल्या अन्य तीन सहकाऱ्यांची नावे सांगितली. त्या चौघांविरोधात वसई रोड पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा, मारहाण करणे आदींसाठी भारतीय न्याय संहितेच्या कलम ११७, ३ (५) आणि ३५२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महिला प्रवाशाचेही डोके फोडले
रेल्वेत जागा अडवून अन्य प्रवाशांना आत न घेण्याचे प्रकार सर्रास सुरू आहेत. मागील महिन्यात विरार मध्ये राहणार्या कविता मेंदारकर (३२) या महिलेला महिलांच्या डब्यात कविता सिंग (२७) या महिलेने बेदम मारहाण केली होती. या मारहाणीत कविता यांच्या डोक्यात मोबाईल मारल्याने त्यांचे डोके फुटून त्या रक्कबंबाळ झाल्या होत्या. विशेष म्हणजे वसई रेल्वे पोलिसांनी ५ हजार रुपयात तडजोड करून प्रकरण मिटवले होते. नंतर माध्मयात बातम्या आल्यानंतर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. सध्या रेल्वे पोलीस आयुक्तालयाकडून या ‘तडजोड’ प्रकरणाची चौकशी सुरू आहे.