मुंबई : पश्चिम रेल्वेवरील विरार – दादर १५ डबा जलद लोकलने भाईंदर येथील थांबा चुकविल्याची घटना घडली. या घटनेमुळे शेकडो प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. या प्रवाशांनी पाठीमागून येणारी वातानुकूलित लोकल थांबवली आणि त्यातून प्रवास केला. लोकल थांबा चुकविणाऱ्या मोटरमनचे निलंबन करण्यात आले असून या प्रकरणी चौकशी समिती नेमण्यात आली आहे.
विरार येथून बुधवार, ८ एप्रिल रोजी सकाळी १०.४४ वाजता विरार – दादर १५ डबा जलद लोकल सुटली. या लोकलला वसई रोड, भाईंदर, दहिसर, अंधेरी आणि दादर येथे थांबे आहेत. ही लोकल सकाळी ११.०१ वाजता भाईंदर स्थानकात येण्याची नियोजित वेळ होती. या लोकलची भाईंदर स्थानकात उद्घोषणा झाली.
प्रवासी जलद लोकल पकडण्यासाठी फलाटावर उतरले. परंतु, लोकल भाईंदर येथे न थांबता पुढे निघून गेली. कार्यालयात जाण्याच्या धावपळीत असतानाच घडलेल्या या प्रकारामुळे अनेक प्रवाशांचा खोळंबा झाला. संतप्त प्रवाशांनी भाईंदर येथे सकाळी ११.१४ वाजता आलेली विरार – चर्चगेट वातानुकूलित लोकल थांबवली. प्रवासी या लोकलमध्ये चढले. त्यामुळे लोकलमध्ये प्रचंड गर्दी झाली.
मात्र वातानुकूलित लोकलचे दरवाजे बंद होत नव्हते. परिणामी, लोकल मार्गस्थ होत नव्हती. यामुळे रेल्वे कर्मचारी आणि प्रवासी यांच्यात वाद झाला. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेत पश्चिम रेल्वे प्रशासनाने चौकशी समिती नेमली आहे. प्राथमिक तपासात मोटरमनची चूक असल्याचे समोर आल्याने संबंधित मोटरमनला तत्काळ निलंबित करण्यात आले. चौकशीदरम्यान नेमके कारण स्पष्ट होईल, असे पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
भांडुप स्थानकातही असाच प्रकार
मध्य रेल्वेवरील भांडुप रेल्वे स्थानकात ११ मार्च २०२६ रोजी वातानुकूलित जलद लोकल न थांबताच पुढे गेली. वातानुकूलित लोकलचे दोन डबे भांडुप स्थानकावरील फलाटाच्या पुढे गेल्यानंतर लोकल थांबली. यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. वातानुकूलित लोकलचे डबे एकमेकांना जोडलेले असल्याने, प्रवासी दुसऱ्या डब्यात गेले आणि तेथून ते फलाटावर उतरले.
कवच प्रणाली कार्यान्वित केली जाणार
लोकल, रेल्वेगाडी चालवताना मोटरमन, लोको पायलट यांच्याद्वारे लाल सिग्नल मोडून, रेल्वेगाडी पुढे नेली जाते. तेव्हा ‘सिग्नल पासिंग ॲट डेंजर’ची (एसपीएडी) घटना घडते. त्यावेळी या घटना टाळण्यासाठी कवच प्रणाली उपयुक्त ठरते. तसेच, सध्या लोकल मार्गिकेवरील ताण कमी करण्यासाठी दोन लोकलमधील अंतर कमी करण्यावर भर दिला जात आहे. कवच प्रणालीमुळे दोन लोकलमधील अंतर कमी होईल. पश्चिम रेल्वेवर कवच प्रणाली कार्यान्वित केली जात आहे.
