मुंबई : परंपरांगत होळी साजरी करण्यासाठी, विरार येथील रहिवासी माहीम येथे जात होते. प्रवासादरम्यान त्यांनी सदर लोकलच्या दरवाजाला मोठ-मोठे बांबू बांधले होते. या घटनेची माहिती पश्चिम रेल्वेला मिळताच बोरिवली येथे बांबू आणि सुपारीच्या झाडाच्या झावळ्या घेऊन जाणाऱ्या प्रवाशांना लोकलमधून उतरवण्यात आले. पश्चिम रेल्वेच्या आरपीएफने या प्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला.
ब्रिटिश काळापासून सुरू असलेली होळीची अनोखी परंपरा जपत, विरार आणि माहीमला उत्सवाद्वारे जोडले जाते. माहीमच्या मोरी रोड परिसरात अनेक चाळी होत्या. या भागात लोकवस्ती वाढत गेली आणि कालौघात येथील चाळींच्या जागेवर बहुमजली इमारती उभ्या राहिल्या. त्या चाळीत वास्तव्यास असलेली अनेक कुटुंबे विरारमध्ये स्थायिक झाली. परंतु, त्यांनी होळीची परंपरा जपली. दरवर्षी विरारमधील अनेक कुटुंबिये माहीमला होळी साजरी करण्यासाठी येतात. यावेळी विरारमधून बांबू, सुपारीच्या झाडाच्या झावळ्या घेऊन, वाजत गाजत, नाचत, जयघोष करत लोकलने प्रवास करतात आणि माहीमच्या मोरी रोडवर होळी साजरी केली जाते. त्यांनी बांबू, सुपारीच्या झाडाच्या झावळ्या लोकलच्या दरवाजाला आडवी बांधली होती. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना लोकलमध्ये चढताना-उतरताना गैरसोय होत होती. तसेच, रेल्वे प्रवाशांना गंभीर इजा होण्याचा धोका होता. या प्रकाराची पश्चिम रेल्वे प्रशासनाने गंभीर दखल घेतली.
रविवारी रात्री ११.४० वाजता विरार – चर्चगेट लोकलच्या दरवाजात बांबू, सुपारीच्या झाडाच्या झावळ्या बांधण्यात लावल्या होत्या. त्यासाठी लोकल बराच वेळ स्थानकात उभी होती. विरार-चर्चगेट लोकल बोरिवली फलाट क्रमांक ५ वर आली असता तेथे कर्तव्यावरील असलेले स्थानक व्यवस्थापक रणजित कुमार यांनी लोकल डब्याची पाहणी केली. काही व्यक्तींनी डब्याला बांबू बांधून आणल्याचे आणि त्यासाठी स्थानकात लोकल थाबविण्याचे लोकल व्यवस्थापक पुरुषोत्तम यांनी त्यांना सांगितले. परिणामी, रात्री १२.२४ ते १२.४६ दरम्यान २० मिनिटे लोकल सेवेवर परिणाम झाला. लोकलला बांबू बांधल्याप्रकरणी संबंधित व्यक्तींना डब्यातून उतरवून, आरपीएफ कार्यालयात नेण्यात आले. चौकशीदरम्यान त्यांनी गुन्हा कबूल केला, अशी माहिती पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
आकाश ढोणे (३३), सागर बने (२२), अनिल कुमार सिंग (२२), अशोक गुंजलप्पा (२७), ब्रह्म देना हुसैन (३८), शेखर कोळी (३७) यांच्याविरोधात रेल्वे अधिनियम १४५ (ब) आणि, १४५ (क) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पश्चिम रेल्वेतील सूत्रांनी सांगितले.
