मुंबई : विरार ते डहाणू रोड चौपदरीकरण प्रकल्पांतर्गत विरार स्थानकाच्या पुनर्विकास कामांना गती देण्यात आली आहे. स्थानक इमारतीचे बांधकाम, उन्नत डेक, नवे फलाट व प्रवासी सुविधांमुळे विरार स्थानकाची उपनगरी वाहतूक हाताळण्याची क्षमतेत वाढ होणार आहे.
फलाट क्रमांक ८ वरील दोन नाल्यांवरील पूल, पाण्याची टाकी, गँग टूल रूम आणि अंतर्गत उपकेंद्राची कामे पूर्ण झाली आहेत. स्थानक इमारत व फलाटावरील सुमारे ८ हजार चौरस मीटर उन्नत डेक उभारणीचे कामही वेगाने सुरू आहे. आतापर्यंत ३६ खांब उभारण्यात आले असून १६० तुळया बसविण्यात आल्या आहेत.
फलाट क्रमांक २, ३ व ४ वरील उन्नत डेकच्या कामासाठी फलाट क्रमांक ३ व ४ वरील सध्याचे आरक्षण कार्यालय नव्या स्थानक इमारतीत स्थलांतरित करण्यात आले आहे. तसेच स्थानकाच्या पूर्व बाजूस तीन तिकीट खिडक्यांसह नवीन आरक्षण कार्यालय सुरू करण्यात आले आहे. फलाट शेडच्या पायाभरणीचे काम पूर्ण झाले आहे. फलाट क्रमांक ५ – बी चे कामही पूर्ण झाले असून १५ डब्यांच्या उपनगरी रेल्वेगाड्यांसाठी कार्यान्वित करण्यात आला आहे.
नारंगी गेटजवळील विरार ते वैतरणा पादचारी पूल पूर्ण करून प्रवाशांसाठी खुला करण्यात आला आहे. फलाट वापरासाठी खुले करण्यात आले आहेत. या सर्व कामांमुळे विरार ते डहाणू रोड चौपदरीकरण प्रकल्पाअंतर्गत भविष्यात वाढणारी लोकल रेल्वे वाहतूक अधिक सक्षमपणे हाताळण्याची विरार स्थानकाची क्षमता लक्षणीयरीत्या वाढणार असल्याची माहिती मुंबई रेल्वे विकास महामंडळाने (एमआरव्हीसी)च्या अधिकाऱ्याने दिली.
