शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून उद्या १ जुलै रोजी मुबंईतून विराट मोर्चा काढण्यात येणार आहे. मुंबई महापालिकेत सत्ताधाऱ्यांनी केलेल्या भ्रष्टाचारविरोधातील हा मोर्चा आहे. दरम्यान, भाजपाने आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत १५० जागांचा नारा दिला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई महापालिकेवर राज्य करणाऱ्या शिवसेना (ठाकरे) आगामी निवडणुकीत महाविकास आघाडीतून निवडणूक लढवणार आहे. एकीकडे भाजपाचे आव्हान असताना दुसरीकडे त्यांना मित्रपक्षाचीच अडचण होणार असल्याचं दबक्या आवाजात बोललं जातंय. या सर्व पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेवर आपली पकड घट्ट राहावी याकरता ठाकरे गटाने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्या पार्श्वभूमीवर १ जुलै रोजी काढण्यात येणारा मोर्चा हा भाजपा हटाव, मुंबई बचाव मोर्चा असल्याचं ठाकरे गटाने सांगितलं आहे. ठाकरे गटाचे अधिकृत मुखपत्र असलेल्या सामना अग्रलेखातून भाजपाकडून सुरू असलेल्या भ्रष्टाचारप्रकरणी तोफ डागण्यात आली आहे. "पहिल्याच मुसळधार पावसाने मुंबई आणि मुंबईकरांची दैना उडाली आहे. भ्रष्टाचाराने मुंबई तुंबल्याचा हा परिणाम. महाराष्ट्राच्या राजधानीत गेल्या दोन वर्षांपासून लोकप्रतिनिधींचे सरकार नाही, महापौर नाहीत, विषय समित्या नाहीत. अधिकाऱ्यांना हाताशी धरून मनमानी पद्धतीने मुंबईचा जो कारभार सध्या चालला आहे त्यास फक्त लुटमार असेच म्हणता येईल. मुंबईचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्व कमी करण्याचे उघड प्रयत्न सुरूच आहेत. त्यात आता मुंबई विद्रूप आणि कंगाल करून मुंबईची उरलीसुरली इभ्रत धुळीला मिळविण्याचे काम फडणवीस - मिंधे सरकार करीत आहे. मुंबई पालिकेत जी लुटमार सुरू आहे ती फडणवीस-मिंधे यांच्या आशीर्वादाने", अशी टीका करण्यात आली. हेही वाचा >> “मला काळजी एका गोष्टीची आहे की, शीख धर्मात…”, समान नागरी कायद्यावर शरद पवारांचं मोठं वक्तव्य "मुंबई म्हणजे मुंबादेवी ही महाराष्ट्राच्या 11 कोटी जनतेची माऊली, पण मिंध्यांसाठी मुंबई म्हणजे 'एटीएम' किंवा सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे. भाजप अंडी खात आहे व मुख्यमंत्री मिंधे यांनी सरळ कोंबडी कापून खाण्याचे ठरवले आहे, ते मोदी-शहांच्या इशाऱ्यावर. मुंबई महानगरपालिकेत 'नगरसेवक' राज्य नसल्याने बिल्डर्स, ठेकेदारांच्या नियंत्रणाखाली सध्या मुंबई महानगरपालिका आहे. लुटमारीचे रोज एक नवे प्रकरण समोर येत आहे. महापालिकेच्या माध्यमातून मुंबईत 400 किलोमीटर रस्त्यांच्या कामात किमान सहा हजार कोटींचा जम्बो घोटाळा झाला आहे. ज्या पाच कंपन्यांना या कामाचे टेंडर मिळाले त्यांच्यामागचे खरे सूत्रधार हे 'खोके' सरकारचे मुख्यमंत्री व त्यांचे कुटुंबीय आहेत. पण तुमची ती 'ईडी' वगैरे यंत्रणा त्याबाबत डोळे मिटून बसली आहे", असंही टीकास्त्र अग्रलेखातून सोडण्यात आलं. "तोट्यातील महापालिका शिवसेनेने फायद्यात आणली. ८८ हजार कोटींच्या ठेवी मुंबई पालिकेने सुरक्षित ठेवल्या. ही श्रीमंती शिवसेनेमुळेच वाढली. आता या ८८ हजार कोटींच्या ठेवी लुटून खाण्याचे कारस्थान सुरू आहे. मुंबई पालिकेने ५२ हजार कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात तरतूद केलेल्या काही प्रकल्पांसाठी ठेवी मोडून १५ हजार कोटी रुपये वापरण्याचा प्रस्ताव मांडला. या ठेवी मोडण्याचा प्रकार गंभीर आहे. लोकप्रतिनिधींचे राज्य नसताना या पैशांवर दरोडा टाकणे हा जनतेच्या पैशांचा अपहार आहे. मुंबईकरांच्या करांच्या पैशांतून जमा केलेल्या ठेवी ही मुंबईकरांची संपत्ती आहे. भारतीय जनता पक्ष हा व्यापारी व ठेकेदारांचा पक्ष आहे. मुंबई शहर व मुंबई महानगरपालिकेशी त्यांचे भावनिक नाते नाही. त्यामुळे मुंबईचे हे असे ओरबाडणे त्यांना व्यथित करीत नाही", असंही ठाकरे गटाने म्हटलंय. हेही वाचा >> राज्यपाल-स्टॅलिन संघर्षांत नवी ठिणगी, तमिळनाडूचे मंत्री सेंथिल यांची राज्यपालांकडून हकालपट्टी "मुंबईची सुरक्षा, नागरी सुविधा याबाबत कोणताही ठोस कार्यक्रम भाजप किंवा त्यांच्या मिंधे गटाकडे नाही. त्यामुळे सहा हजार कोटींची रस्त्यांची कामे बेधडक देऊन घोटाळ्याचा मार्ग तयार केला. रस्त्यांचे सरसकट काँक्रिटीकरण हे कोणत्याही शहरासाठी धोकादायक आहे. मुंबई हे आधीच सिमेंटचे जंगल बनले आहे. त्यात काँक्रिटीकरणामुळे नाले, गटारे यांच्या मार्गात बुच लागेल. मुंबईची ड्रेनेज व्यवस्था इंग्रज काळातली आहे व त्यावरचा ताण कमालीचा वाढला आहे. त्यामुळे मुंबईचा 'जोशीमठ' व्हायला वेळ लागणार नाही. मुंबई पालिकेत लोकप्रतिनिधी नसताना रस्ते, नालेसफाईची कामे झाली, पण पहिल्याच पावसात मुंबई तुंबली व लोकांचे हाल झाले. आता शिवसेनेची सत्ता नाही. राज्य तर मिंध्यांचेच आहे. मग या तुंबण्याचे खापर कोणावर फोडणार?", असा सवालही त्यांनी उपस्थित केला. "मुख्यमंत्री सांगतात, 'पावसाचे स्वागत करा. मुंबईच्या तुंबण्याकडे दुर्लक्ष करा.' हे विधान असंवेदनशील आहे. मुंबई-ठाण्याच्या जनतेचे पहिल्याच पावसात जे हाल झाले ते गेल्या वर्षभरात झालेल्या घोटाळ्यांमुळे. रस्ते खड्ड्यांत, नालेसफाई पूर्ण बोंबलली. मग या सगळ्यांवर खर्च झालेला पैसा कोठे वाहून गेला? नगरसेवकांचा कार्यकाळ ७ मार्च २०२२ ला संपला. त्यानंतर म्हणजे ८ मार्चपासून मुंबई महापालिकेवर प्रशासकीय राजवट सुरू झाली. या काळात मुंबई-ठाण्यासह सर्वच महानगरपालिकांत झालेले आर्थिक व्यवहार म्हणजे फक्त घोटाळेच घोटाळे आहेत", असा आरोप यामाध्यमातून पुन्हा करण्यात आला. "मुंबई महापालिकेत स्ट्रीट फर्निचरचा घोटाळा याच काळात झाला. एकाच मर्जीतल्या कॉन्ट्रक्टरसाठी १६० कोटींची कामे ही २६३ कोटींना दिली. हा मधला 'गाळा' ज्यांनी मारला ते मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी त्यांच्याच गोतावळ्यात आहेत. रस्ते, फर्निचर, आरोग्य अशा सर्वच विभागांत फक्त टेंडरबाजीला ऊत आला असून या सर्व घोटाळेबाजांवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करून त्यांच्यावर खटले चालवायला हवेत, पण सध्या साप समजून भुई धोपटण्याचे प्रकार सुरू आहेत", अशी टीकाही यावेळी करण्यात आली. "मुंबई महापालिका, मुंबई शहर एका बाजूला सध्याचे दिल्लीश्वर लुटत आहेत, तर दुसऱ्या बाजूला भाजप व त्यांची मिंधे पिलावळही लुटमार करीत आहे. तपास यंत्रणा या घोटाळय़ांकडे डोळेझाक करीत आहेत. अशा वेळी मुंबई महापालिकेच्या रक्षणासाठी शनिवार, 1 जुलै रोजी जनता रस्त्यावर उतरत आहे. मुंबई महापालिकेची लुटमार होत असताना जो मुर्दाडासारखा बसेल तो मुंबईकर कसला? 105 हुतात्म्यांच्या बलिदानातून मुंबई महाराष्ट्राला मिळाली. त्या मुंबईस ओरबाडण्यासाठी सगळे महाराष्ट्रद्वेष्टे एक झाले आहेत. मुंबई हे महाराष्ट्राच्या भाळावरील ठसठशीत कुंकू आहे, मुंबई हेच महाराष्ट्राचे सौभाग्य! ते सौभाग्य अखंड राखण्यासाठी उद्याचा विराट मोर्चा धडकणार आहे. मुंबईकरांची ही ताकद पाहून दिल्लीलाही हादरे बसू द्या!", असंही ठाकरे गटाने मुंबईकरांना आवाहन केलं आहे.