मुंबई : माजी महापौर आणि शिवसेनेच्या (ठाकरे) नगरसेविका विशाखा राऊत यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यानंतर त्यांचे नगरसेवक पद रद्द झाल्याबद्दलची अधिसूचना राज्य सरकारने शुक्रवारी जारी केली. आता येत्या सोमवारी मुंबई महानगरपालिकेच्या महासभेत त्याबाबतची औपचारिक घोषणा करण्यात येण्याची शक्यता आहे. विशाखा राऊत या अनुभवी नगरसेविका असून त्यांचेच पद रद्द होणार असल्यामुळे हा शिवसेना (ठाकरे) पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

शिवसेना (ठाकरे) पक्षाच्या अनुभवी नगरसेविका विशाखा राऊत यांचे जात प्रमाणपत्र पालघर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने अवैध ठरवले होते. त्यामुळे, राऊत यांच्या नगरसेवक पद धोक्यात आले आहे. समितीच्या निर्णयाच्या आधारे मुंबई महापालिका आयुक्तांनी राज्य सरकारला पत्रव्यवहार करून राऊत यांच्याविरुद्ध अपात्रतेची प्रक्रिया सुरू करण्याची मागणी केली होती. या पत्रव्यवहाराहाविरोधात राऊत यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालय काय निर्णय देणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. न्यायालयाने राऊत यांना दिलासा दिला नाही. त्यामुळे त्यांचे नगरसेवक पद रद्द होणार हे निश्चित झाले होते. केवळ महापालिका महासभेत त्याची घोषणा होणे बाकी आहे. त्याच्या आधीच राज्याच्या नगर विकास विभागाने याबाबतची अधिसूचना जारी केली.

मुंबई महानगरपालिकेची महासभा

येत्या सोमवारी असून त्यात याबाबत घोषणा होण्याची शक्यता आहे. महापालिकेच्या चिटणीस विभागाने तशी तयारीही केल्याचे समजते. यापूर्वी चार नगरसेवकांचे पद रद्द झाल्याची घोषणा सभागृहात झाली आहे. राऊत यांची घोषणा झाल्यास नगरसेवकपद बाद झालेल्यांची संख्या पाच होणार आहे.

राऊत या दादरच्या प्रभाग क्रमांक १९१ मधून निवडून आल्या होत्या. सिद्धीविनायक मंदिर, शिवाजी पार्क, दादर पश्चिम हा भाग त्यांच्या प्रभागात येतो. मुंबई महानगरपालिका अधिनियम, १८८८ मधील कलम १६ नुसार त्या नगरसेवकपदासाठी अपात्र ठरल्या असून त्यांची जागा रिक्त झाली आहे.

राऊत यांनी २०२६ मध्ये झालेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत नागरिकांच्या मागासवर्गासाठी राखीव असलेल्या प्रभागातून निवडणूक लढवून विजय मिळवला होता. सरकारने २० ऑगस्ट २०२६ पासून सहा वर्षांच्या कालावधीसाठी त्यांना नगरसेवक म्हणून निवडून येण्यास किंवा नगरसेवक म्हणून राहण्यास अपात्र ठरवले आहे. त्यामुळे त्यांच्या नगरसेवकपदाची जागा रिक्त झाल्याचे राजपत्रात नमूद करण्यात आले आहे.

यापूर्वी कोणाचीही अधिसूचना नव्हती

यापूर्वी जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यामुळे मुंबई महापालिकेच्या २२७ पैकी चार नगरसेवकांचे नगरसेवक पद रद्द झाले. त्यात प्रभाग क्रमांक १३८ च्या एमआयएमच्या नगरसेविका रोशन शेख, भांडूप प्रभाग क्रमांक १११ मधील शिवसेना (ठाकरे) पक्षाचे नगरसेवक दीपक राजाराम सावंत, गोवंडी येथील प्रभाग क्रमांक १३७ मधील एमआयएमचे नगरसेवक शमीर रमजान पटेल आणि राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाच्या कुर्ला येथील प्रभाग क्रमांक १७० नगरसेविका बुशरा कप्तान मलिक या नगरसेवकांचा समावेश आहे. आता विशाखा राऊत यांच्या नावाची घोषणा झाल्यास ही संख्या पाच होईल. मात्र यापूर्वीच्या चार नगरसेवकांच्याबाबत नगर विकास विभागाने अधिसूचना काढली नव्हती. पण विशाखा राऊत यांच्याबाबत अधिसूचना काढल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.