मशिदींवरील भोंग्यावरून सुरू झालेल्या वादानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या “मातोश्री” निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसाचे पठण करणार असल्याची घोषणा करणाऱ्या खासदार नवनीत आणि आमदार रवी राणा यांच्या विरोधात मागील आठवड्यात रस्त्यावर उतरलेल्या शेकडो शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये एक समर्पित शिवसैनिक, मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचा देखील समावेश होता. जर मशिदींनी लाऊडस्पीकर वापरणे सुरू ठेवले.

चार वेळा नगरसेवक राहिलेले महाडेश्वर रविवारी प्रकाशझोतात आले होते. जेव्हा भाजपाचे नेते किरीट सोमय्या हे राणा दाम्पत्याची भेट घेण्यासाठी खार पोलीस ठाण्यात आले होते आणि तिथून परत जात असताना त्यांच्या गाडीवर शिवसैनिकांकडून दगडफेक करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. सोमय्यांच्या या तक्रारीवरून पोलिसांनी सोमवारी महाडेश्वर आणि इतर सात जणांना अटक केली. परंतु पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध जामीनपात्र कलमे लावल्याने त्यांना जामीन मिळाला.

नुकतेच ६२ वर्षांचे झालेले महाडेश्वर हे शाळेचे निवृत्त मुख्याध्यापकही आहेत. शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांचे निकटवर्तीय मानले जाणारे ते तीन दशकांहून अधिक काळ पक्षासोबत आहेत. २००२ मध्ये ते पहिल्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले आणि २०१७ ते २०१९ या काळात त्यांनी मुंबईचे महापौर म्हणून काम पाहिले.

आपल्या महापौरपदाच्या काळात महाडेश्वर वादात सापडले होते. त्यांनी त्यांच्या अधिकृत गाडीतून लाल दिवा काढण्यास नकार दिला होता आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) स्ट्रॉम वॉटर ड्रेन विभागाच्या मुख्य अभियंत्यांसोबत त्यांची बाचाबाचीही झाली होती. याचबरोबर ऑगस्ट २०१९ मध्ये, मुंबईच्या सांताक्रूझ पूर्व भागात त्यांनी एका महिलेशी कथितरित्या गैरवर्तन केल्याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर आला होता. विजेचा धक्का लागून मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी ते त्या परिसरात गेले होते.

त्या वर्षी महाडेश्वर यांनी वांद्रे पूर्व मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवली, जो शिवसेनेसाठी महत्त्वाचा मतदारसंघ समजला जातो कारण “मातोश्री” निवासस्थान याच परिसरात आहे. परंतु बंडखोर उमेदवार तृप्ती सावंत यांना २०,००० हून अधिक मते मिळाल्याने आणि शिवसेनेची मत कमी झाल्याने ते काँग्रेसच्या झीशान सिद्दीकी यांच्याकडून पराभूत झाले. २००९ आणि २०१४ मध्ये हा मतदारसंघ जिंकलेल्या पती प्रकाश सावंत यांच्या निधनानंतर २०१५ मध्ये तृप्ती सावंत यांनी शिवसेनेच्या तिकिटावर या जागेवरून पोटनिवडणूक जिंकली होती.
शिवसेनेच्या नेत्यांनी सांगितले की, महाडेश्वर निवडणुकीच्या पराभवापासून काहीसे मागे पडले होते. परंतु सोमय्या प्रकरणामुळे ते पुन्हा चर्चेत आले आहेत. सोमय्यांच्या गाडीने शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना खाली पाडण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार महाडेश्वर यांनी पोलिसांत केली आहे. पोलिसांनी सोमय्या यांच्या चालकावर बेदरकारपणे गाडी चालवल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.