लोकसत्ता प्रतिनिधी मुंबई: बँक खात्यात मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार झाल्याचे सांगून सायबर भामट्यांनी ७५ वर्षीय वृद्ध महिलेला तब्बल ५ कोटींना गंडा घातल्याचा प्रकार वडाळा परिसरात उघडकीस आला आहे. पोलिस आधिकारी विश्वास नांगरे पाटील यांच्या नावाने ही फसवणूक करण्यात आली असून याबाबत सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.

फसवणूक झालेली ज्येष्ठ नागरिक महिला वडाळा परिसरात एकटीच राहते. काही दिवसांपूर्वी त्यांना एका अनोळखी मोबाइल नंबर वरून फोन आला. फोन करणाऱ्या इसमाने आपण नाशिक पोलीस ठाणे येथून बोलत असल्याचे सांगून तुमच्या बँक खात्यात मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार झाल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांनी दुसऱ्या एका इसमाला फोन देत आपण आयपीएस विश्वास नांगरे पाटील बोलत असल्याचे सांगितले. या दोन्ही आरोपींनी महिलेला अटक करण्याची भीती दाखवून तिच्याकडे असलेले सोने आणि पैशाचा हिशोब देण्यास सांगितले.

यावेळी विश्वास पटण्यासाठी आरोपींनी पोलीस गणवेश परिधान करून महिलेला व्हिडीओ कॉलही केला होता. महिलेकडे आईचे पूर्वीचे मोठ्या प्रमाणात दागिने होते. ही बाब आरोपींना समजताच त्यांनी महिलेला हे दागिने गहाण ठेऊन तत्काळ सर्व पैसे एका बँक खात्यात जमा करण्यास सांगितले. त्यानंतर चौकशी संपल्यावर पुन्हा काही दिवसात हे पैसे तुमच्या घरी पाठवले जातील, असे देखील सांगण्यात आले.

महिलेने देखील विश्वास ठेवून हे सर्व दागिने गहाण ठेऊन आरोपींच्या बँक खात्यात एकूण ४ कोटी ७० लाख रुपये पाठवले. मात्र, अनेक दिवस उलटल्यानंतर देखील कोणीही हे पैसे घेऊन घरी आला नाही. फसवणूक झाली असल्याचे महिलेच्या लक्षात येताच त्यांनी याबाबत सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.