बाबासाहेब पुरंदरे हे केवळ ब्राम्हण समाजातील आहेत म्हणून त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यास विरोध करणे अत्यंत चुकीचे आहे. तसेच शिवाजी महाराजांचे नाव घेऊन समाजात अशाप्रकारे जातीद्वेष पसरवणे अयोग्य असल्याचे सांगत ज्येष्ठ लेखक विश्वास पाटील यांनी मंगळवारी बाबासाहेबांना देण्यात येणाऱ्या पुरस्काराचे समर्थन केले. बाबासाहेब पुरंदरेंचा होणारा सन्मान हा मराठी मातीचा सन्मान आहे. बाबासाहेबांनी कधीही ते इतिहासकार असल्याचा टेंभा मिरवला नाही. त्यांनी कायमच स्वत:ला शिवशाहीर म्हणवून घेतले. मात्र, आता काही राजकीय पक्ष त्यांनी लिहलेले शिवचरित्र चुकीचे असल्याचे सांगत त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यापासून विरोध करत आहेत. राजकीय पक्षांचा हा विरोध जातीद्वेषातून निर्माण झालेला आहे. या राजकीय पक्षांचे शिवाजी महाराजांवरील प्रेम हे वरवरचे आणि उसने आहे. या राजकीय नेत्यांना परदेशात जायला वेळ असतो. मात्र, हे नेते कित्येक वर्षात महाराष्ट्रातील किल्ल्यांकडे फिरकत नाही, अशी टीका विश्वास पाटील यांनी केली. यावेळी विश्वास पाटील यांनी पुरंदरेंना पुरस्कार देण्यास विरोध करणाऱ्या भालचंद्र नेमाडेंवरही सडकून टीका केली. नेमाडेंनी कधीही शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा अभ्यास गांभीर्याने केलेला नाही. शिवाजी महाराजांबद्दलचा त्यांचा अभ्यास हा वरवरचा आहे.  त्यांची उक्ती एक असते आणि कृती एक असते. आयुष्यभर कुसुमाग्रज आणि पु.ल. देशपांडे यांच्या लिखाणाची खिल्ली उडवणारे भालचंद्र नेमाडे कुसुमाग्रजांच्या नावाने देण्यात येणारा पुरस्कार मात्र स्विकारतात. पारितोषिकांना विरोध करणारे नेमाडे आज मिळेल ते पारितोषिक स्वीकारत असल्याची टीका यावेळी विश्वास पाटील यांनी केली.