मुंबई : इंग्लंड म्हटले की लंडन, बकिंगहॅम पॅलेस आणि तेथील प्रसिद्ध पर्यटनस्थळे डोळ्यांसमोर येतात. मात्र, इंग्लंडच्या उत्तरेकडील भागात ऐतिहासिक वास्तू, जागतिक दर्जाची संग्रहालये, प्रीमियर लीग फुटबॉल, आंतरराष्ट्रीय क्रिकेट, संगीत, खाद्यसंस्कृती आणि निसर्गरम्य समुद्रकिनारे अशी पर्यटनाची विविधांगी संधी उपलब्ध आहे. या भागातील पर्यटनस्थळांकडे भारतीय पर्यटकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी ब्रिटनची राष्ट्रीय पर्यटन संस्था ‘व्हिजिटब्रिटन’ने पुढाकार घेतला आहे. त्याचाच भाग म्हणून ‘इंग्लंड्स ग्रेट नॉर्थ डेस्टिनेशन शोकेस २०२६’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून मुंबईत भारतीय पर्यटन व्यावसायिकांशी संवाद साधण्यात आला.
‘ज्या पर्यटकांना नेहमीच्या प्रवासाऐवजी काहीतरी वेगळे अनुभवायचे आहे, त्यांच्यासाठी उत्तर इंग्लंड हा उत्तम पर्याय आहे. येथील क्रीडा, खाद्यसंस्कृती आणि स्थानिकांशी संवाद यातून वेगळी अनुभूती मिळेल,’ असा विश्वास व्हिजिट ब्रिटनचे (युरोप, भारत) उपसंचालक गॅरी रॉबसन यांनी व्यक्त केली. यातून उत्तर इंग्लंडमधील पर्यटन व्यवसाय आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देण्याचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.
भारतीय पर्यटकांना कोणत्या प्रकारचे अनुभव आकर्षित करतात, त्यांना प्रवासाचे नियोजन करताना कोणत्या अडचणी येतात आणि उत्तर इंग्लंडचा समावेश त्यांच्या प्रवासाच्या आराखड्यात कसा करता येईल, यावर परिषदेत चर्चा करण्यात आली.
क्रीडा, वारसा आणि निसर्गाची सांगड
‘उत्तर इंग्लंडच्या पर्यटनाचे वैशिष्ट्य म्हणजे एकाच प्रवासात विविध अनुभव घेण्याची संधी. न्यूकॅसलसारख्या शहरांमधील सांस्कृतिक वातावरण, ऐतिहासिक किल्ले, प्राचीन वास्तू आणि संग्रहालये यांच्यासोबतच निसर्गरम्य समुद्रकिनारे आणि विस्तीर्ण ग्रामीण परिसर पर्यटकांना अनुभवता येतो. फुटबॉल आणि क्रिकेटच्या चाहत्यांसाठीही हा प्रदेश महत्त्वाचा आहे. क्रीडा स्पर्धा पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांनी शहरातील पर्यटनस्थळे, खाद्यसंस्कृती आणि स्थानिक जीवनशैलीचाही अनुभव घ्यावा, यासाठी विशेष पर्यटन योजना तयार कराव्या,’ असे आवाहन द ग्रेट नॉर्थच्या अध्यक्ष किम मॅकगिनेस यांनी केले.
परिषदेत सहभागी झालेल्या उत्तर इंग्लंडमधील प्रतिनिधींनी तेथील स्थानिक लोकांचे आतिथ्य, मैत्रीपूर्ण स्वभाव आणि सांस्कृतिक वैविध्य हे पर्यटनाचे महत्त्वाचे आकर्षण असल्याचे सांगितले. पर्यटन म्हणजे केवळ प्रसिद्ध स्थळांना भेट देणे नव्हे, तर त्या प्रदेशातील लोकजीवन आणि संस्कृती अनुभवणे अशी भूमिका त्यांनी मांडली.
पर्यटनातून रोजगार आणि गुंतवणुकीला चालना
‘लिव्हरपूलची जागतिक स्तरावर ओळख आहेच. भारताचे या प्रांताशी असलेले संबंध दृढ करण्यावर आमचा भर आहे. भारतीय पर्यटकांची संख्या वाढल्यास त्याचा फायदा केवळ पर्यटनस्थळांना किंवा हॉटेल व्यवसायाला होणार नाही, तर स्थानिक दुकाने, वाहतूक, खाद्यव्यवसाय आणि अन्य सेवांनाही होईल. पर्यटनामुळे रोजगारनिर्मिती, गुंतवणूक आणि शहरांच्या आर्थिक पुनर्विकासाला चालना मिळू शकते. भारत आणि उत्तर इंग्लंड यांच्यातील संबंध पर्यटनापुरते मर्यादित न राहता व्यापार, शिक्षण आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीपर्यंत विस्तारावेत,’ अशी अपेक्षा लिव्हरपूल सिटी रिजनचे महापौर स्टीव्ह रॉथेरम यांनी व्यक्त केली.
मँचेस्टर क्रिकेटमधून भारताशी नवे नाते
मँचेस्टर शहराचे भारताशी क्रिकेटच्या माध्यमातून जुने नाते आहे. क्रिकेट किंवा फुटबॉल सामना पाहण्यासाठी परदेशात जाणाऱ्या भारतीय पर्यटकांना त्या शहरातील अन्य पर्यटनस्थळेही अनुभवता येतील.
