मुंबई : परिवहन विभागाच्या कार्यपद्धतीत पारदर्शकता, तंत्रज्ञानाचा वापर, नागरिकाभिमुख सेवा आणि प्रशासकीय सुधारणांना प्राधान्य असून ‘महाराष्ट्र लोकसेवा आयोगा’चे (एमपीएससी) अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या परिवहन आयुक्तपदाच्या कार्यकाळातील निर्णयांचा संदर्भ देत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी केलेले विविध आरोप परिवहन विभागाने फेटाळून लावले आहेत.

रोहित पवार यांनी लोकसेवा आयोग पेपरफुटीप्रकरणी भीमनवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. या मुद्द्यावरून पुण्यात आंदोलनही सुरू झाले असून, पेपरफुटीची चौकशी आणि एमपीएससीच्या परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकतेच्या मागण्या पुढे आल्या आहेत.

रोहित पवार यांनी भीमनवार परिवहन आयुक्त असतानाच्या काळातील निर्णयांवरही भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. यामध्ये एचएसआरपी क्रमांकफलकातील कथित गैरव्यवहार, ऑनलाइन बदल्यांतील अपारदर्शकता आणि अन्य प्रकरणांचा समावेश आहे. यावर स्पष्टीकरण देताना परिवहन विभागाने वस्तुस्थिती स्पष्ट करत हे आरोप संबंधित नोंदी, न्यायालयीन कार्यवाही आणि विभागीय निर्णयांच्या आधारे तपासणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे.

एचएसआरपी दर महाराष्ट्रात इतर राज्यांच्या तुलनेत समान किंवा कमी आहेत. या विषयावर नागपूर खंडपीठात दाखल झालेली जनहित याचिका न्यायालयाने फेटाळून सरकारच्या बाजूने निर्णय दिला आहे. व्हीएलटीडी उपकरणांच्या बाबतीत राज्याने स्वतंत्र निविदा काढलेली नसून केंद्र सरकारने मान्यता दिलेल्या सर्व कंपन्यांना उपकरणे बसविण्याची परवानगी असल्याचे स्पष्टीकरण विभागाने केले आहे.

रिफ्लेक्टर टेपच्या बाबतीत २०२३ मध्ये विशिष्ट कंपन्यांचा क्यूआर कोड बंधनकारक करण्याची पद्धत रद्द करण्यात आली. त्यामुळे सर्व कंपन्यांना स्वतःचा क्यूआर कोड वापरण्याची मुभा मिळाली आणि टेपच्या किमतीत मोठी घट झाल्याचा दावा विभागाने केला. परिवहन विभागातील बदल्या गेल्या तीन वर्षांपासून ऑनलाइन पद्धतीने होत असल्याचेही विभागाने स्पष्ट केले.

अंधेरी कार्यालयातील वाहनचालक परवान्यांमधील अनियमितता आढळल्यानंतर संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांवर निलंबन, शिस्तभंगाची कारवाई आणि विभागीय चौकशी करण्यात आल्याचे विभागाचे म्हणणे आहे. पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील आयटीएमएस करारांचे उच्चाधिकार समितीने पुनर्विलोकन केले असून, सेवा पुरवठादाराचा अंतर्गत परतावा दर (आयआरआर) १८ टक्क्यांपर्यंत मर्यादित केल्याने सरकारी महसुलाची बचत झाल्याचा दावा करण्यात आला आहे.

रडारयुक्त इंटरसेप्टर वाहनांच्या खरेदीबाबत तक्रारींच्या आधारे विशेष लेखापरीक्षण करण्यात आले. निविदा प्रक्रियेत त्रुटी नसल्याने महालेखापरीक्षकांकडून (कॅग) आक्षेप नोंदविण्यात आलेला नसल्याचे विभागाने म्हटले आहे. तसेच अरुणाचल प्रदेश, नागालँड आदी राज्यांतील चोरीच्या वाहनांची बनावट कागदपत्रांच्या आधारे नोंदणी झाल्याची प्रकरणे उघडकीस आल्यानंतर गुन्हे दाखल करून संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आल्याचेही स्पष्ट करण्यात आले.

तक्रारदाराच्या पार्श्वभूमीचाही उल्लेख

रोहित पवार यांनी प्रसिद्ध केलेल्या तक्रारीतील तक्रारदाराचे नाव जाणीवपूर्वक झाकण्यात आले असल्याचे विभागाने नमूद केले आहे. संबंधित तक्रारदार उपप्रादेशिक परिवहन अधिकारी असल्याचे विभागाचे म्हणणे आहे. त्यांच्याविरुद्ध बनावट कागदपत्रांच्या आधारे वाहन मालकी हस्तांतरणासंबंधी पोलिस तक्रारी, प्रशिक्षणादरम्यान गैरवर्तनाबाबत अहवाल, परिविक्षा कालावधीतील असमाधानकारक कार्यपद्धती तसेच विभागीय चौकशी प्रस्तावित असल्याचा दावा विभागाने केला आहे.

तीन वर्षांत अनेक सुधारणा

परिवहन विभागाने गेल्या तीन वर्षांत ५७ परिवहन सेवा ‘फेसलेस’ (कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित न राहता ऑनलाइन सेवा) केल्याने आरटीओ कार्यालयांतील नागरिकांची प्रत्यक्ष उपस्थिती ३४ टक्क्यांनी कमी झाल्याचा दावा केला आहे. बदल्यांची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन करण्यात आली असून, रिफ्लेक्टर टेपमधील मक्तेदारी संपुष्टात आणल्याने किंमती ५० टक्क्यांहून अधिक कमी झाल्याचे विभागाचे म्हणणे आहे. सीमा तपासणी नाके बंद करण्याची प्रक्रियाही अंतिम टप्प्यात असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

एमपीएससी पेपरफुटीच्या काळात भीमनवार पदावर नव्हते

औषध निरीक्षक परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटीवरूनही भीमनवार यांच्यावर आरोप होत आहेत. या प्रकरणात भीमनवार यांनी दिलेल्या स्पष्टीकरणानुसार प्रश्नपत्रिका फुटीची घटना जानेवारी, २०२६ मध्ये घडली. त्यांनी एमपीएससी अध्यक्षपदाची शपथ १८ फेब्रुवारी २०२६ रोजी घेतली आणि ३ मार्च रोजी प्रत्यक्ष पदभार स्वीकारला. त्यामुळे प्रश्नपत्रिका फुटीच्या वेळी ते अध्यक्षपदावर नव्हते, असा त्यांचा दावा आहे. आयोगाने या प्रकरणी तक्रार दाखल केली असून पोलिस तपास सुरू आहे. पदभार स्वीकारल्यानंतर परीक्षा आणि भरती प्रक्रियेची विश्वासार्हता, पारदर्शकता आणि सुरक्षितता वाढविण्यासाठी विविध सुधारणा हाती घेतल्याचे भीमनवार यांनी स्पष्ट केले आहे.