मुंबई : मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक विजय कुमार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या पदाचा अतिरिक्त पदभार पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक विवेक कुमार गुप्ता यांनी स्वीकारला.भारतीय रेल्वे अभियंता सेवेतील १९८८ तुकडीचे वरिष्ठ अधिकारी असलेले विवेक कुमार गुप्ता सध्या पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी हे पद ११ जुलै २०२५ रोजी स्वीकारले. यापूर्वी ते नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडचे (एनएचएसआरसीएल) व्यवस्थापकीय संचालक होते. या संस्थेकडे भारतातील पहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या अंमलबजावणीची जबाबदारी आहे.

गुप्ता यांनी भारतीय रेल्वेमधील त्यांनी कारकीर्दीत अनेक महत्त्वाची पदे भूषवली आहेत. रेल्वे मंत्रालयाच्या रेल्वे मंडळात प्रधान कार्यकारी संचालक/गति-शक्ती म्हणून गुप्ता यांनी काम केले आहे. तेथे ते सात विभागांच्या एकात्मिक कामकाजाची जबाबदारी त्यांच्यावर होती. नागरी (बांधकाम, प्रकल्प देखरेख आणि स्टेशन विकास), विद्युत (आरई), सिग्नल आणि दूरसंचार, वाहतूक, वित्त, नियोजन आणि आर्थिक संचालनालये, पीएम गती-शक्ती उपक्रमांतर्गत स्थानक विकासासह सर्व प्रमुख रेल्वे प्रकल्पांचे नियोजन आणि अंमलबजावणीसाठी एक एकीकृत युनिट म्हणून त्यांनी काम पाहिले आहे.

मुंबई रेल्वे विकास महामंडळ (एमआरव्हीसी) मध्ये मुख्य अभियंता म्हणून काम करताना, गुप्ता यांनी सुमारे २०,००० कोटींच्या एकत्रित प्रकल्प मूल्याच्या एमयूटीपी एक, दोन आणि तीन प्रकल्पांच्या समन्वय आणि अंमलबजावणीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी ३४,००० कोटी खर्चाच्या एमयूटीपी तीन ए प्रकल्पाच्या प्राथमिक कामाचे नेतृत्व देखील केले.

पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वेमध्ये मुख्य प्रशासकीय अधिकारी (बांधकाम), मुख्य ट्रॅक अभियंता, मुख्य पूल अभियंता आणि विभागीय रेल्वे व्यवस्थापक अशी अनेक प्रतिष्ठित पदे गुप्ता यांनी भूषवली आहेत. या पदांवर असताना त्यांनी नवीन मार्गिका बांधकाम, गेज रूपांतरण, दुहेरीकरण आणि बहु-ट्रॅकिंग प्रकल्प, ट्रॅक बांधकाम कामे, वाहतूक सुविधा आणि पूल देखभाल यासारख्या महत्त्वाच्या पायाभूत सुविधांच्या कामांचे पर्यवेक्षण केले.