राष्ट्रीय हॅकेथॉनमध्ये बाजी; संकल्पना विकसित करण्याची जबाबदारी अणुऊर्जा आयोगाने उचलली

आपत्ती व्यवस्थापनाचे तंत्र एका अ‍ॅपवर विकसित करण्याचे कौशल्य व्हीजेटीआयच्या ‘टीम टेक जंकीज’ या चमूने दाखविले. नुकत्याच झालेल्या सलग ३६ तासांच्या राष्ट्रीय हॅकेथॉनमध्ये दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक देण्यात आले. या चमूला तब्बल ७५ हजार रुपयांचे पारितोषिक मिळाले असून पुढे त्यांची संकल्पना विकसित करण्याची जबाबदारी अणुऊर्जा आयोगाने घेतली आहे.

Upsc ची तयारी: अर्थव्यवस्था : भारतातील बेरोजगारीचे अंत:प्रवाह
LinkedIn, top companies, india
वित्तीय, तंत्रज्ञान क्षेत्राची आघाडी; लिंक्डइनकडून देशातील मोठ्या २५ कंपन्यांची यादी जाहीर
Versova Koliwada, facilities Versova koliwada,
वर्सोवा कोळीवाड्याला सोयी-सुविधांची प्रतीक्षा
Using skin lightening cream can cause kidney cancer
सावधान! त्वचा उजळणारे क्रिम वापरताय तर हे नक्की वाचा…

देशातील विविध समस्यांवर तंत्रज्ञानाने तोडगा शोधण्यासाठी देशभरात विविध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. याच प्रयत्नांचाच एक भाग म्हणून केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय आणि अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेतर्फे ‘स्मार्ट इंडिया हॅकेथॉन २०१७’चे आयोजन करण्यात आले होते. या हॅकेथॉन विविध समस्या विद्यार्थ्यांपुढे मांडण्यात आल्या होत्या. या समस्यांवर विद्यार्थ्यांनी तोडगा काढणे अपेक्षित होते. यानुसार आपत्ती व्यवस्थापनाच्या प्रश्नावर व्हीजेटीआयच्या चमूने तोडगा काढला व तो प्रत्यक्षात येणे शक्य असल्याने त्याना पारितोषिकही देण्यात आले. ‘टीम टेक जंकीज’ने जीपीएस तंत्रज्ञानाच्या साहाय्याने आपत्ती व्यवस्थापन कसे करता येईल याबाबतचे तंत्रज्ञान विकसित केले. यामध्ये या विद्यार्थ्यांनी आपत्ती व्यवस्थापनाची माहिती मिळवण्यासाठी एक केंद्रीय कक्ष तयार केला होता. या कक्षाचा प्रमुख एखादी जबाबदार व्यक्ती असणे अपेक्षित आहे. यानंतर विद्यार्थ्यांनी चार वेगवेगळे अ‍ॅप विकसित केले. यातील पहिले अ‍ॅप हे सरकारी यंत्रणांसाठी असणार आहे.

या अ‍ॅपच्याद्वारे विविध सरकारी यंत्रणा झालेल्या किंवा होणाऱ्या आपत्तीची माहिती केंद्रीय कक्षाला कळवू शकणार आहेत. ही माहिती मिळाल्यावर केंद्रीय कक्ष स्थानिक पातळीवर घटनेची खातरजमा करून माहिती खरी असल्याचे निश्चित करेल. त्यानंतर हे अ‍ॅप असलेल्या सर्व यंत्रणांना सूचना पोहोचणार आहे. यामुळे आपत्ती आल्यावर आवश्यक असलेल्या सर्व यंत्रणा सज्ज होण्यास मदत मिळणार असल्याचे ‘टीम टेक जंकीज’चा प्रमुख सौरभ पाटील याने सांगितले. यानंतर दुसरे अ‍ॅप आहे जे सर्व वैद्यकीय यंत्रणांसाठी असून ज्या भागात आपत्ती झाली आहे त्या परिसरात किती रुग्णालये आहेत तेथे किती जागा उपलब्ध आहेत, रुग्णवाहिनी उपलब्ध आहे की नाही याचा तपशील गोळा करू शकणार आहे. हा तपशील मिळाल्यावर आवश्यकतेनुसार केंद्रीय कक्ष रुग्णवाहिनी पाठवू शकणार आहे.

यानंतर तिसऱ्या अ‍ॅपचे काम सुरू होणार असून हे अ‍ॅप रुग्णवाहिनी चालकाकडे असणार आहे. त्याला त्याच्या अ‍ॅपवर कुठे जायचे हे समजल्यावर ओला व उबेरसारख्या सेवांमध्ये वापरण्यात येणाऱ्या अ‍ॅपसारखे हे अ‍ॅप काम करेल व चालकाला रस्ता दाखवेल अशी माहितीही सौरभने दिली. चौथे अ‍ॅप सामान्य नागरिकांसाठी उपलब्ध असून ते केंद्रीय कक्षाला माहिती पुरवू शकणार आहेत. मात्र ही माहिती खरी आहे की नाही हे तपासूनच केंद्रीय कक्ष यंत्रणांना सज्ज करेल असेही सौरभने सांगितले. एमसीएचे शिक्षण घेत असलेल्या या चमूने विकसित केलेली यंत्रणा प्रत्यक्षात येणे शक्य असल्याने सरकारी पातळीवरून त्यांना सहकार्य दिले जात आहे. सरकारी तज्ज्ञांच्या त्रुटी लक्षात घेऊन त्यात आवश्यक त्या सुधारणा करून हे अ‍ॅप उपयोगात आणण्याचा मानस असल्याचे सौरभने स्पष्ट केले.

हॅकेथॉन अशी!

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय आणि अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेतर्फे ‘स्मार्ट इंडिया हॅकेथॉन २०१७’चे आयोजन करण्यात आले होते. देशभरात सलग ३६ तास सुरू असलेल्या या हॅकेथॉनमध्ये कोलकाता येथील बी. पी. पोद्दार व्यवस्थापन आणि तंत्रज्ञान संस्थेने पहिले पारितोषिक पटकाविले. तर दुसरे पारितोषिक व्हीजेटीआय महाविद्यालयाच्या ‘टीम टेक जंकीज’ने पटकाविले. तिसरे पारितोषिक मोहाली येथील चंडिगढ अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या चमूने तर पुण्यातील सिंहगड संस्थेच्या चमूला उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. या स्पध्रेत दहा हजारांहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. मुंबईच्या वेलिंगकर व्यवस्थापन संस्थेतील केंद्रात अणु ऊर्जा आयोगाने १७ विविध समस्या दिल्या होत्या.