मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या प्रथम सत्र उन्हाळी २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या तृतीय वर्ष बीए सत्र ६ परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. अवघ्या १२ दिवसात हा निकाल जाहीर करण्यात आला. त्याचबरोबर प्रथम सत्र उन्हाळी २०२६ मध्ये घेतलेल्या तृतीय वर्ष बीएससी कॉम्प्युटर सायन्स (संगणक विज्ञान) सत्र ६ चाही निकाल २२ मे रोजी जाहीर करण्यात आला.

मुंबई विद्यापीठाकडून घेण्यात आलेल्या बीए सत्र ६ परीक्षेसाठी एकूण १२ हजार ७३४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील १२ हजार ४१० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांपैकी ४ हजार ९९४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर २ हजार ५१५ विद्यार्थ्यांचे निकाल एबीसी आयडी अभावी राखीव ठेवण्यात आले आहेत. या निकालाची उत्तीर्णतेची टक्केवारी ६५.३० एवढी आहे.

बीएससी कॉम्प्युटर सायन्सचाही निकाल जाहीर प्रथम सत्र उन्हाळी २०२६ मधील तृतीय वर्ष बीएससी कॉम्प्युटर सायन्स सत्र ६ चा निकाल विद्यापीठाकडून जाहीर करण्यात आला. या परीक्षेसाठी एकूण ५ हजाार २८२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ५ हजार २०९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यापैकी ३ हजार २०० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या निकालाची उत्तीर्णतेची टक्केवारी ७४.७८ एवढी आहे. दोन्ही परीक्षेचे निकाल मुंबई विद्यापीठाच्या https://www.mumresults.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

निकाल वेळेत जाहीर करण्यासाठी योग्य नियाजेन उन्हाळी सत्र २०२६ च्या तृतीय वर्ष सत्र ६ च्या या परीक्षांचे निकाल वेळेत जाहीर करण्यासाठी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, प्र. कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षा विभागाचे उप कुलसचिव नरेंद्र खलाणे यांनी सुक्ष्म नियोजन केले होते. केंद्रीय मूल्यांकन कक्षाचे अधिकारी यांच्यासह अधिष्ठाता, सहयोगी अधिष्ठाता, केंद्रीय मूल्यांकन सल्लागार, प्राचार्य, शिक्षक आणि सीसीएफचे सर्व अधिकारी यांनी परीक्षा संपल्यापासून जलदगतीने मूल्यांकन केल्याचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालिका डॉ. पूजा रौंदळे यांनी सांगितले.