मुंबई : सांताक्रुझमधील व्ही. एन. देसाई रुग्णालयातील रक्तपेढी जून २०२५ पासून नूतनीकरणासाठी बंद करण्यात आली होती. या रक्तपेढीचे काम तब्बल सात महिने धीम्या गतीने सुरू होते. मात्र जानेवारीमध्ये नूतनीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतरही मागील दोन महिन्यांपासून रक्तपेढी उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. यामुळे रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी आर्थिक भूर्दंट सोसून खासगी रक्तपेढीतून रक्त विकत आणावे लागत आहे. नूतनीकरण पूर्ण झाल्याने रक्तपेढीचे तातडीने उद्घाटन करावे, अशी मागणी रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांकडून करण्यात येत आहे.
व्ही. एन. देसाई रुग्णालयामधील रक्तपेढी २२ जानेवारी १९९३ मध्ये सुरू करण्यात आली होती. या रक्तपेढीमध्ये दरवर्षी जवळपास दोन हजारांपेक्षा अधिक रक्तपिशव्यांचे संकलन केले जात होते. केईएम, नायर, शीव रुग्णालयासारख्या अनेक मोठ्या रुग्णालयांमधील रक्तपेढ्यांना या रक्तपेढीतून रक्तपुरवठा केला जात होता. त्याचप्रमाणे वांद्रे येथील भाभा रुग्णालयातील रक्तपेढी रात्री कार्यरत नसल्याने या रुग्णालयातील रुग्णांसाठी व्ही.एन. देसाई रुग्णालयाची रक्तपेढी आधार ठरत होती. तसेच वांद्रे, सांताक्रूझ परिसरातील महापालिकेच्या प्रसूतीगृहांनाही याच रक्तपेढीवर अवलंबून राहावे लागत होते. व्ही. एन. देसाई रुग्णालयामध्ये भारतातील ख्यातनाम मणक्याचे शल्यचिकित्सक डॉ. भोजराज यांचे एक पथक कार्यरत आहे.
डॉ. भोजराज यांच्याकडून अनेकदा मोठ्या शस्त्रक्रिया केल्या जातात. त्यावेळी त्यांना रक्तपिशव्यांची तातडीने गरज भासते. खासगी रुग्णालयांत लाखो रुपये खर्च येणाऱ्या मणक्यांच्या शस्त्रक्रिया व्ही. एन. देसाई रुग्णालयात माफक दरामध्ये हाेतात. त्यामुळे अन्य शहरांतील रुग्णही येथे उपचारासाठी येत असतात. रुग्णालयामध्ये डीएनबी अभ्यासक्रम शिकवण्यात येत असल्याने गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियाही केल्या जातात.
प्रसूतीदरम्यान अतिरक्तस्राव झालेल्या अनेक महिलांना सलग ५ ते ६ रक्तपिशव्यांची गरज भासते. अशावेळी रुग्णालयातील रक्तपेढी बंद असल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना खासगी रक्तपेढ्यांमध्ये धाव घ्यावी लागते. मागील नऊ महिन्यांपासून रुग्णालयातील रक्तपेढी बंद असल्याने त्याचा फटका रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना बसत आहे. तसेच आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत आहे.
रुग्णालयातील रक्तपेढीचे काम पूर्ण करण्यासाठी रुग्णालय प्रशासनाला तब्बल सात महिने लागले. नूतनीकरणाचे काम पूर्ण होऊन दोन महिन उलटले तरी रक्तपेढीच्या उद्घाटनाला रुग्णालय प्रशासनाकडून विलंब केला जात आहे. त्यामुळे रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांकडून संताप व्यक्त केला जात आहे. तसेच रक्तपेढीचे उद्घाटन कधी करण्यात येणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मुंबई महानगरपालिकेमधील सत्ताधारी पक्षाने ही रक्तपेढी तातडीने सुरू करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. दरम्यान, यासंदर्भात रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. मयुरा नागले यांच्याशी दूरध्वनी, व्हॉट्स ॲपद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही.
रक्तपेढीचे नूतनीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतरही तिच्या उद्घाटनासाठी होत असलेल्या विलंबाचे नेमके कारण शोधून ती तातडीने सुरू करण्यासाठी आम्ही पाठपुरावा करू. – ॲड. ट्युलिप मिरांडा, स्थायी समिती सदस्य
