मुंबई: राज्यात सुरू असलेल्या मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) कार्यक्रमांतर्गत मतदारांनी १७ ऑगस्ट पर्यंत गणना अर्ज भरून संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्याकडे जमा करावेत, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने गुरुवारी केले. भारत निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या वेळापत्रकानुसार गणना अर्ज भरून स्वाक्षरी केलेल्या मतदारांची नावे २४ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होणाऱ्या प्रारूप मतदार यादीत समाविष्ट केली जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

लोकप्रतिनिधित्व अधिनियमानुसार एका व्यक्तीचे नाव एकापेक्षा अधिक ठिकाणी मतदार यादीत नोंदवता येत नाही. त्यामुळे ज्या मतदारांची नावे एकाहून अधिक ठिकाणी असतील त्यांनी सध्याच्या वास्तव्यास असलेल्या ठिकाणासाठीच गणना अर्ज भरावा. इतर ठिकाणच्या अर्जावर ‘आधीच नोंदणीकृत’ अशी नोंद करून त्या ठिकाणी नाव समाविष्ट केले जाणार नाही, असे मुख्य अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

यादीत नाव नसलेल्यांसाठी नमूना अर्ज ६

प्रारूप मतदार यादीत पात्र असूनही नाव नसलेल्या किंवा नव्याने मतदार म्हणून नोंदणी करू इच्छिणाऱ्या नागरिकांना २४ ऑगस्ट ते २३ सप्टेंबर या कालावधीत नमुना क्र. ६ भरून नाव समाविष्ट करण्याची सुविधा उपलब्ध राहणार आहे. त्याचप्रमाणे नोंदीतील दुरुस्तीसाठी नमुना क्र. ८ आणि नाव वगळण्यासाठी नमुना क्र. ७ सादर करता येणार आहे. आवश्यक घोषणापत्र आणि कागदपत्रासह हे नवीन अर्ज स्वीकारले जातील. त्यानंतर पडताळणी करून पात्र मतदारांची नावे अंतिम यादीत समाविष्ट केले जातील. खोटी माहिती देऊन नाव समाविष्ट करण्याचा किंवा दुरुस्तीचा प्रयत्न केल्यास एक वर्षापर्यंत कारावास, दंड किंवा दोन्ही शिक्षेची तरतूद असल्याचा इशाराही मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडून देण्यात आला आहे.

सर्व हरकती आणि दावे निकाली काढल्यानंतर २७ ऑक्टोबर २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. तसेच अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यानंतरही कायद्यातील तरतुदींनुसार मतदार यादीतील नोंदींचे सतत अद्ययावतीकरण सुरू राहणार असल्याची माहितीही मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.