राज्यातील तिसऱ्या आणि अखेरच्या टप्प्यात मुंबई, ठाणे, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडय़ातील १९ मतदारसंघांमध्ये गुरुवारी होणाऱ्या मतदानात माणिकराव गावित, छगन भुजबळ आणि सुनील तटकरे या मंत्र्यांसह ३३८ उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहे. पहिल्या दोन टप्प्यांत मतदानाची टक्केवारी वाढल्याने मुंबई आणि ठाण्यातील मतदानाचा टक्का वाढतो का, हा उत्सुकतेचा मुद्दा ठरला आहे.
राज्यात आतापर्यंत निवडणूक झालेल्या २९ मतदारसंघांमध्ये सरासरी ६३ टक्के मतदान झाले आहे. या पाश्र्वभूमीवर तिसऱ्या टप्प्यात मतदानाची टक्केवारी वाढेल यावर राजकीय पक्ष व विशेषत: युतीचे नेते आशावादी आहेत.  मुंबई व ठाणे मतदारसंघात गेल्या वेळी सरासरी ४० टक्के मतदान झाले होते. मुंबईत मतदारांमध्ये नेहमीच निरुत्साह आढळून येतो. मतदानाच्या दिवशी मुंबईकर सुट्टीसाठी बाहेरगावी जातात. यंदा जास्त मतदान व्हावे, असा जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात आला. राज्याच्या अन्य भागांमध्ये सरासरी ६० टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झाल्याने मुंबई व ठाणे पट्टय़ात ५० टक्क्यांच्या आसपास मतदान होईल, या आशेवर राजकीय नेते आहेत. पुणे मतदारसंघात मतदार यादीतून मोठय़ा प्रमाणावर नावे वगळल्याचे अनेक मतदारांना मतदानाच्या प्रत्यक्ष दिवशी समजले. यामुळे मुंबईकर अधिक सावध झाले आणि निवडणूक विभागाच्या संकेतस्थळावर आपले नाव आहे की नाही, याची खातरजमा करण्याकरिता गेले पाच दिवस मोठा ओघ असल्याचे सांगण्यात आले.
आघाडी की युती?
मुंबईतील सहाही जागा गेल्या वेळी काँग्रेस-राष्ट्रवादीनेजिंकल्या होत्या. गुरुदास कामत, मिलिंद देवरा, एकनाथ गायकवाड आणि प्रिया दत्त हॅटट्रिक करण्याच्या प्रयत्नांत आहेत. मुंबईचा कल एकाच पक्षाच्या बाजूने असतो हा इतिहास लक्षात घेता मोदी घटकाच्या पाश्र्वभूमीवर मुंबईत १०० टक्के यश मिळविण्यावर युतीने भर दिला आहे.
नंदुरबारमध्ये केंद्रीय राज्यमंत्री माणिकराव गावित हे लागोपाठ दहाव्यांदा विजयासाठी रिंगणात उतरले असले तरी माजी मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या कन्येने त्यांच्यासमोर कडवे आव्हान उभे केले आहे.
नाशिकमध्ये छगन भुजबळ तर रायगडमध्ये सुनील तटकरे या दोन मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. औरंगाबादमध्ये चंद्रकांत खैरे, ईशान्य मुंबईत किरीट सोमय्या, उत्तर मुंबईत संजय निरुपम, ठाण्यात संजीव नाईक, कल्याणमध्ये आनंद परांजपे आदींचे भवितव्य गुरुवारी ठरणार आहे.
देशात सहाव्या टप्प्यासाठी आज मतदान
११ राज्ये : ’महाराष्ट्र (१९) ’तामिळनाडू (३९) ’बिहार (७) ’उत्तर प्रदेश (१२) ’पश्चिम बंगाल (६) ’जम्मू आणि काश्मीर (१) ’झारखंड (४) ’छत्तीसगढ (७) ’मध्य प्रदेश (१०) ’राजस्थान (५) ’आसाम (६) ’केंद्रशासित प्रदेश – पुद्दुचेरी (१)

उमेदवार : २०७६   जागा : ११७   मतदार  १८ कोटी

आज यांचीही परीक्षा..
मुलायमसिंह यादव, सुषमा स्वराज, हेमा मालिनी, सलमान खुर्शीद, तारिक अन्वर, ए. राजा, कीर्ती चिदम्बरम्, नारायण सामी, दयानिधी मारन, शिबू सोरेन, बाबुलाल मरांडी, डिंपल यादव, अभिजीत मुखर्जी,
टी बाळू, वायको     

मतदानाबद्दल लक्षात ठेवा..
*मतदानाची वेळ : सकाळी ७ ते सायंकाळी ६
*मतदान केंद्रांवर मोबाइल नेण्यास बंदी आहे
*नेलपॉलिश लावलेले नसावे
*मतदार यादीत नाव असेल तरच मत देता येईल
*यादीत नाव आहे, पण आयोगाचे ओळखपत्र नसेल तर तुमचे छायाचित्र लावलेले पुढीलपैकी कोणतेही एक ओळखपत्र चालेल- १. पारपत्र  २. वाहनपरवाना ३. केंद्र, राज्य, सार्वजनिक उपक्रमात नोकरीस असल्यास तेथील ओळखपत्र ४. पॅनकार्ड ५. आधार कार्ड ६. राष्ट्रीय जनगणना नोंदीनुसार रजिस्ट्रार जनरल यांनी दिलेले स्मार्ट कार्ड ७. मनरेगा कार्ड ९. कामगार मंत्रालयाच्या आरोग्य विमा योजनेचे स्मार्ट कार्ड