मुंबई देशातील सगळ्यात मोठे महानगर असले तरीही राजकीय सजगतेच्या निकषावर ते सगळ्यात मागे होते. मुंबईतील मतदान ५० च्या आसपासच नेहमी घोटाळते. या विधानसभा निवडणुकीत मात्र ते चांगलेच वर गेले हे एक ठळक वैशिष्टय़ म्हणावे लागेल. त्याचबरोबर लोकसभेप्रमाणेच विधानसभेसाठीही गुजराती बांधव झुंडीच्या झुंडीने उतरतील, असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र काही ठरावीक मतदारसंघ वगळता गुजराती बांधवांचा मतदानाबद्दलचा उत्साह लोकसभा निवडणुकीसारखा उरला नसल्याचे चित्र दिसत होते. त्याचवेळी मागील विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत मात्र मतदानाबाबत अधिक जागृती झाल्याने मतदानाच्या टक्केवारीत लक्षणीय वाढ झाली.
मलबार हिल, घाटकोपर, दहिसर आदी मतदारसंघामध्ये गुजराती मतदारांची संख्या लक्षणीय होती. मलबार हिलमध्ये तर मॉर्निग वॉकहून, तसेच मंदिरात दर्शन घेऊन परतणारे गुजराती मतदार घरी जाण्यापूर्वी मतदान केंद्रात हजेरी लावत होते. हळूहळू दिवस चढू लागला आणि या मतदारसंघांमधील मतदान केंद्रांमध्ये गुजराती मतदारांचा टक्का वाढू लागला. गुजराती मतदारांची संख्या लोकसभा निवडणुकीइतकी नसली तरी याही वेळी ती नजरेत भरण्याजोगीच होती. तर चारकोप आणि दिंडोशी परिसरात अधिक संख्येने वास्तव्यास असलेल्या गुजराती बांधवांचा मतदानासाठी निरुत्साह दिसून आला.
सकाळी साडेसात-आठच्या सुमारास गुजराती मतदारांची उपस्थिती चांगलीच वाढत असल्याचे दिसताच शिवसेना, काँग्रेस उमेदवारांची धावपळ सुरू झाली. मग ‘आपल्या हक्काच्या’ मराठी मतदारांना उतरविण्यासाठी मराठी उमेदवारांनी आपापल्या कार्यकर्त्यांना पिटाळायला सुरुवात केली. काही आदी विभागांमध्ये गुजराती मतदार घोळक्याघोळक्याने मतदानासाठी घराबाहेर पडताना दिसत होते. परंतु लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत हे प्रमाण कमी होते.
गेल्या निवडणुकीतील माहीम मतदारसंघातील पराभव शिवसेनेच्या जिव्हारी लागला होता. असे असतानाही यावेळीही या मतदारसंघातील काही मतदान केंद्रात सकाळी १० वाजेपर्यंत मतदारांची संख्या तुरळक दिसत होती. तसेच तरुणांच्या तुलनेत ज्येष्ठ नागरिकांची संख्या अधिक होती. हळूहळू गुजराती, मारवाडी आणि मुस्लिम बांधव मतदानासाठी उतरले आणि मतदानाच्या टक्केवारीत सुधारणा होऊ लागली.
दक्षिण मुंबईतील मोहम्मदअली रोड ते चर्चगेट या परिसरात मात्र परस्परविरोधी दृश्य पाहायला मिळत होते. मोहम्मदअली रोड, मांडवी परिसरात मोठय़ा प्रमाणात मुस्लिम तसेच अन्य भाषिक लोक मतदानासाठी उतरले होते. तर गुजराती भाषिकांची वस्ती असलेल्या फोर्ट- बोराबाजार आणि चर्चगेट परिसरातील मतदान केंद्रांवर मात्र नेमके उलट चित्र होते. या परिसरांतील मतदान केंद्रांवर अगदी तुरळक मतदार दिसत होते. बोराबाजार हा गुजराती वस्ती म्हणून ओळखला जातो. त्यामुळे या परिसरात मतदानासाठी लोक उतरतील अशी अपेक्षा होती. मात्र तसे घडत नव्हते. उलट या परिसरात शांतता जाणवत होती.