मुंबई : वडाळा येथील महापालिकेच्या सुमारे ९०० सदनिकांच्या पुनर्विकासाला उच्च न्यायालयाने हिरवा कंदील दाखवला. न्यायालयाच्या या निर्णयामुळे रखडलेल्या या प्रकल्पाचा मार्ग मोकळा झाला असून प्रकल्प सुरू होण्याची १३ वर्षांहून अधिक काळ वाट पाहणाऱ्या रहिवाशांना दिलासा मिळाला आहे.
विकासकाकडून झालेल्या प्रचंड विलंबामुळे रहिवासी जुन्या आणि मोडकळीस आलेल्या इमारतींमध्ये खितपत पडले आहेत, असे निरीक्षणही न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या एकलपीठाने नोंदवले. मेसर्स पायोनियर कन्स्ट्रक्शन्सची याचिका फेटाळताना, सहकारनगर सहकारी गृहनिर्माण संस्थेला नवीन विकासकासह पुढे जाण्यासही न्यायालयाने परवानगी दिली. नवीन विकासकाची नियुक्ती रोखण्याच्या मागणीसाठी कंपनीने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. तथापि, न्यायालयाने ती अमान्य करताना उपरोक्त निर्णय दिला.
वडाळा येथे १९५७ मध्ये बांधलेल्या ४६ इमारतींमध्ये ८२६ निवासी गाळे, तसेच दुकाने आणि स्टॉल्स यांचा समावेश आहे. संस्थेने सुरुवातीला म्हणजेच २०१३ मध्ये पायोनियर कन्स्ट्रक्शन्सची विकासक म्हणून नियुक्ती केली होती. मात्र, एका दशकाहून अधिक काळ लोटूनही या प्रकल्पाचे काम पुढे सरकले नाही. हीच बाब लक्षात घेऊन न्यायालयाने कंपनीची अंतरिम दिलासा देण्याची मागणी करणारी याचिका फेटाळली. तसेच, विकासकाने गेल्या १३ वर्षांच्या प्रदीर्घ काळात प्रकल्पासंदर्भात कोणत्याही उपाययोजना केल्या नाहीत आणि प्रकल्पाची एकही वीट रचली गेली नाही, असे ताशेरे न्यायालयाने ओढले.
संस्थेचे सदस्य जुन्या आणि मोडकळीस आलेल्या इमारतींमध्ये खितपत पडले आहेत. त्यामुळे याचिकाकर्ता विकासकाच्या नफा कमावण्याच्या अधिकाराच्या तुलनेत, सदस्यांसाठी सुरक्षित आणि अधिक चांगल्या घरांमध्ये राहण्याचा अधिकार पणाला लागला आहे आणि तो कैकपटीने श्रेष्ठ आहे, अशी टिप्पणीही न्यायालयाने केली. विकासकाकडून महत्त्वपूर्ण तथ्ये दडपल्याच्या मुद्यावरही न्यायालयाने आदेशात बोट ठेवले. संस्थेने २०२४ च्या सर्वसाधारण सभेत ठराव मंजूर करून विकासकाची नियुक्ती यापूर्वीच रद्द केली होती, ही बाब विकासकाने उघड केली नाही, असे न्यायालयाने कंपनीला दिलासा नाकारताना नमूद केले. डिसेंबर २०२५ मध्ये राज्य सरकारने रद्द केलेले ‘ना-हरकत प्रमाणपत्र’ विकासक अजूनही आधार म्हणून वापरत असल्याकडेही न्यायालयाने लक्ष वेधले.
कंपनीला दिलासा दिल्यास प्रकल्प आणखी रखडेल
विकासकाची २०१३ मध्ये नियुक्ती होऊनही त्याने आगाऊ रक्कम’ म्हणून १ कोटी रुपये जमा करण्याव्यतिरिक्त काहीही काम केले नाही. ही याचिका मान्य केल्यास पुनर्विकासाचे काम आणखी रखडेल, असा युक्तिवाद रहिवाशांच्या वतीने करण्यात आला. हा युक्तिवाद न्यायालयाने मान्य केला. तसेच, कंपनीला अंतरिम दिलासा दिल्यास प्रकल्पाला अनिश्चित काळासाठी विलंब होईल आणि रहिवाशांचा जीव धोक्यात येईल. थोडक्यात, अंतरिम उपाययोजनांना मंजुरी देण्यात आल्यास त्याचा परिणाम म्हणून पुनर्विकास प्रकल्प अनिश्चित काळासाठी लांबणीवर पडेल. दुसरीकडे, दिलासा नाकारल्यास याचिकाकर्त्याला केवळ नफा कमावण्याची संधी गमवावी लागेल याकडे न्यायालयाने लक्ष वेधले.
विकासकाचा दावा अमान्य
न्यायालयाच्या हस्तक्षेपाशिवाय करार रद्द करता येणार नाही हा विकसकाचा युक्तिवादही न्यायालयाने फेटाळून लावला. तसेच, स्थावर मालमत्तेच्या विक्रीसाठी केल्या जाणाऱ्या करारांपेक्षा या कराराचे स्वरूप वेगळे असल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले. कंपनीची याचिका फेटाळून लावतानाच, दोन्ही पक्षांमधील विवादांचे निवारण करण्यासाठी न्यायालयाने वकील अमृत जोशी यांची मध्यस्थ म्हणून नियुक्ती केली.
