मुंबई : ॲग्नेलो वल्दारिस या २५ वर्षांच्या तरुणाच्या कथित पोलीस कोठडीतील मृत्यू प्रकरणी आठ पोलीस कर्मचाऱ्यांवर खुनाचा आरोप निश्चित करण्याच्या सत्र न्यायालयाचा निर्णय उच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे. त्यामुळे, या पोलिसांवर खुनाच्या आरोपाप्रकरणी खटला चालणार आहे.

वल्दारिस याच्या मृत्यूशी संबंधित परिस्थितीमुळे या प्रकरणी संपूर्ण खटला चालवणे आवश्यक असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. या पोलिसांवर सत्र न्यायालयाने १७ सप्टेंबर २०२२ रोजी खुनाचा आरोप निश्चित केला होता. या निर्णयाला वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र राठोड, सहायक पोलीस निरीक्षक अर्चना पुजारी, पोलीस उपनिरीक्षक शत्रुघ्न टोंडसे, हवालदार सुरेश माने आणि पोलीस शिपाई तुषार खैरनार, रवींद्र माने, विकास सूर्यवंशी व सत्यजित कांबळे यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.

खुनाच्या आरोपाला पुष्टी देणारा कोणताही पुरावा नाही. शिवाय, ॲग्नेलो हा कोठडीतून पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना रेल्वेची धडक लागून त्याचा मृत्यू झाला, असा दावा याचिकाकर्त्या पोलिसांतर्फे करण्यात आला होता. तथापि, सह-कैद्यांचे जबाब आणि वैद्यकीय पुराव्यांवरून ॲग्नेलो याचा कोठडीत छळ झाला. शिवाय, ॲग्नेलो आणि इतर तिघांना कथितरित्या बेकायदेशीरपणे ताब्यात घेण्यात आले होते, त्यांना मारहाण करण्यात आली होती आणि कोठडीत त्यांचा छळ करण्यात आल्याचे दिसून येते, असे निरीक्षण न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती श्याम चांडक यांच्या खंडपीठाने याचिकाकर्त्या पोलिसांची याचिका फेटाळताना नमूद केले.

मृत व्यक्ती स्वतःसाठी न्यायाची मागणी करू शकत नाहीत; त्यांच्या वतीने तसे करणे हे जिवंत व्यक्तींचे कर्तव्य आहे, असेही न्यायालयाने नमूद केले. एप्रिल २०१४ मध्ये ॲग्नेलोचा मृत्यू हा घातपातामुळे झाला होता की तो केवळ एक अपघात होता, याविषयी या खटल्यामुळे एक गंभीर वाद निर्माण झाला असल्याचेही न्यायालयाने म्हटले.

आरोपांनुसार, वडाळा पोलिसांनी चोरीच्या आरोपांतर्गत ॲग्नेलो याला अटक केली होती. तसेच, पोलीस कोठडीत त्याची मानसिक व शारीरिक छळवणूक केली होती. त्यातच त्याचा मृत्यू झाल्याचा दावा ॲग्नेलो याच्या कुटुंबीयांनी केला होता. तर दंडाधिकारी न्यायालयात नेत असताना त्याने पोलिसांच्या हातून निसटण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात तो बाजूने भरधाव जात असलेल्या लोकलला धडकला आणि त्याचा मृत्यू झाला, असा दावा या प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीबीआयने केला होता. तथापि, सत्र न्यायालयाने आठही आरोपींवर खुनाचा आरोप निश्चित केला होता.