मुंबई : वडाळा ट्रक टर्मिनल पोलिसांनी कोठडीत केलेल्या मारहाणीमुळे विजय सिंह (२६) या तरूणाचा मृत्यू झालेला नाही, तर भीतीमुळे अचानक आलेल्या हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाला हा सीबीआयने नोंदवलेला निष्कर्ष उच्च न्यायालयाने मान्य केला. तसेच, मुलाचा कोठडी मृत्यू झाल्याचा दावा करणारी टॅक्सी चालकाची याचिका फेटाळली. न्यायालयाच्या या निर्णयामुळे पोलिसांच्या मारहाणीत विजयचा मृत्यू झाल्याच्या आरोपांप्रकरणी वडाळा ट्रक टर्मिनल पोलिसांना दिलासा मिळाला आहे.
सहा वर्षांपूर्वीच्या या प्रकरणात याचिकाकर्त्यांनी केलेल्या आरोपांना ठोस पुराव्यांचा आधार नाही. वैद्यकीय आणि वैज्ञानिक पुरावे विजयचा मृत्यू स्पष्टपणे हृदयविकारामुळे झाल्याचे दर्शवतात. तसेच, केवळ संशय किंवा आरोपांच्या आधारे पोलिसांनी गुन्हा केल्याचे म्हणता येणार नाही, असे निरीक्षणही न्यायमूर्ती भारती डांगरे आणि न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठाने विजय याच्या वडिलांची याचिका फेटाळताना नोंदवले. याशिवाय, साक्षीदारांचे जबाब, शवविच्छेदन अहवाल, तसेच केईएम, जेजे रुग्णालय आणि एम्सच्या वैद्यकीय तज्ज्ञांच्या मतांचा विचार करून सीबीआयने पोलिसांविरोधात कोणताही गुन्हा सिद्ध होत नसल्याचे अहवालात म्हटले होते. त्याप्रमाणे, त्या आधारे मृत्यू मारहाणीत नव्हे, तर अचानक आलेल्या हृदयविकाराच्या धक्क्याने झाल्याचा निष्कर्ष नोंदवला होता. त्यामुळे सीबीआयने या प्रकरणी दाखल केलेला अंतिम अहवाल स्वीकारत असल्याचे स्पष्ट केले.
दरम्यान, विजयच्या मृत्यूनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परिस्थिती लक्षात घेऊन हे प्रकरण सुरूवातीला विशेष तपास पथकाकडे (एसआयटी) वर्ग करण्यात आले. परंतु, एसआयटीला तपासादरम्यान काहीच आढळून न आल्यामुळे त्यांनी पोलिसांविरुद्ध गुन्हा दाखल केला जाऊ शकत नाही, असा निर्वाळा दिला. मात्र, एसआयटी’च्या तपासातील त्रुटींवर बोट ठेवून विजयचे वडील हृदय सिंह यांनी पुन्हा एकदा न्यायालयात धाव घेतली व प्रकरण सीबीआयकडे वर्ग करण्याची मागणी केली होती. न्यायालयानेही त्यांची मागणी मान्य करून ११ सप्टेंबर २०२५ मध्ये तपास सीबीआयकडे वर्ग केला होता.
प्रकरण काय ?
एमएमआरडीए कपांऊंड येथे २७ ऑक्टोबर २०१९ रोजी रात्री साडे अकराच्या सुमारास दोन गटात वाद सुरु होता. गस्तीवरील वडाळा टी. टी. पोलिसांच्या गुन्हे प्रतिबंधक पथकाने विजयला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेले. तसेच त्यांच्यावर अदखलपात्र गुन्हाही दाखल केला. मात्र, यावेळी ताब्यात घेण्यात आलेल्या विजयच्या अचानक छातीत दुखायला लागले. त्यामुळे, त्याला तात्काळ शीव रुग्णालयात दाखल केले गेले. परंतु, उपचारांपूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले, असा पोलिसांचा दावा होता. दुसरीकडे, पोलिसांच्या ताब्यात असताना विजयचा मृत्यू झाला असून तो संशयास्पद असल्याचा दावा करून त्याच्या वडिलांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
