मुंबई : दुसऱ्या विवाहाला विरोध केल्यावरून २० वर्षीय मुलीची वडिलांनी हत्या केल्याची घटना वडाळा पूर्वेकडील मॅडोना कॉलनीत उघडकीस आली. या प्रकरणी शरीफ रझा हुसेन खान (४५) याला वडाळा पोलिसांनी अटक केली. शरीफ याने आधी मुलीला चिकन बिर्याणीत विष मिसळून खाऊ घातले व ती बेशुद्ध झाल्यानंतर तिचा गळा आवळून तिची हत्या केली. त्यानंतर मुलीला अन्नातून विषबाधा झाल्याचा बनाव रचला. मात्र, केईएम रुग्णालयातील डॉक्टरांची सतर्कता व शवविच्छेदन अहवालामुळे हत्या उघडकीस आली.
शरीफ खान याच्या पत्नीचे नोव्हेंबर २०२५ मध्ये कर्करोगाने निधन झाले. त्यानंतर शरीफ हा त्याची मोठी मुलगी रिफत (२०), लहान मुलगी नुझत (१६) व १० वर्षांचा मुलगा अहमद यांच्यासोबत राहत होता. पत्नीच्या निधनानंतर काही महिन्यांतच शरीफला दुसरे लग्न करायचे होते. परंतु, दुसऱ्या लग्नास दोन्ही मुलींचा, विशेषतः मोठी मुलगी रिफतचा विरोध होता. या मुद्द्यावरून घरात वारंवार वाद होत होते. रिफतच्या विरोधामुळे आपले दुसरे लग्न होत नसल्याबद्दल शरीफ संतापला होता, त्यातूनच त्याने मुलीच्या खुनाचा कट रचला.
२ ऑक्टोबर रोजी रात्री शरीफने बाहेरून चिकन बिर्यानी आणली व त्यात विषारी औषध मिसळून ते दोन्ही मुलींना खाऊ घातले. त्यानंतर लहान मुलगी नुझत तिच्या मावशीच्या घरी झोपण्यासाठी गेली. घरात रिफत एकटीच होती. विषाचा प्रभाव सुरू होताच रिफत तीव्र वेदनेने तडफडू लागली आणि काही वेळातच बेशुद्ध पडली. त्यानंतर शरीफने गळा आवळून रिफतची हत्या केली.
३ ऑक्टोबर रोजी पहाटे ५ च्या सुमारास शरीफने मावशीच्या घरी जाऊन रिफत उठत नसल्याचे आणि तिला ‘फूड पॉयझनिंग’ झाल्याचा कांगावा केला. स्वतःचा बचाव करण्यासाठी त्याने रिफतला पालिकेच्या केईएम रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय तपासणीदरम्यान डॉक्टरांना तिच्या गळ्यावर संशयास्पद खुणा व शरीरात विषाचे अंश आढळल्याने त्यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. डॉक्टरांच्या पथकाने केलेल्या शवविच्छेदनात रिफतचा मृत्यू गळा आवळल्याने व विषबाधेमुळे झाल्याचे निष्पन्न झाले. वडाळा पोलिसांनी केईएम रुग्णालयातून प्राप्त झालेल्या वैद्यकीय अहवालाच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरली आणि शरीफ खानला तात्काळ ताब्यात घेऊन अटक करण्यात आली.
