मुंबई : भारतात लहान मुलं आणि किशोरवयीन मुलांमध्ये टाइप-१ मधुमेहाचे प्रमाण सातत्याने वाढत असून ही एक चिंताजनक बाब ठरत आहे. सध्या देशात तीन लाखांहून अधिक मुले टाइप-१ मधुमेहासह जीवन जगत आहेत. दरवर्षी सुमारे १९ हजार नवीन मुलांना या आजाराचे निदान होत आहे.बाई जेरबाई वाडिया हॉस्पिटल फॉर चिल्ड्रन च्या पेडियाट्रिक एंडोक्राइनोलॉजी विभागात सध्या टाइप-१ मधुमेह असलेल्या १,३०० हून अधिक मुलांवर उपचार सुरू आहेत. यापैकी १,२०० पेक्षा अधिक मुलं नियमितपणे रुग्णालयात येऊन उपचार आणि फॉलो-अप करून घेत आहेत. विशेष म्हणजे, या रुग्णालयात जवळपास दर पाच दिवसांनी एका नव्या बालरुग्णामध्ये टाइप-१ मधुमेहाचे निदान होत आहे.

रुग्णालयात दर आठवड्याला विशेष मधुमेह तपासणी ओपीडी भरविण्यात येते. येथे पेडियाट्रिक एंडोक्राइनोलॉजिस्ट, मधुमेह तज्ज्ञ, परिचारिका, आहारतज्ज्ञ आणि मानसोपचारतज्ज्ञ यांच्या संयुक्त मार्गदर्शनाखाली मुलांना व त्यांच्या पालकांना उपचार, योग्य आहार, मानसिक आधार आणि आजाराविषयी संपूर्ण माहिती दिली जाते, ज्यामुळे मुलांना अधिक चांगले आणि सक्षम जीवन जगण्यास मदत होते.

रुग्णालयाच्या वैद्यकीय संचालिका व बाल एंडोक्राइनोलॉजिस्ट डॉ. सुधा राव म्हणाल्या, भारतात मुलांमध्ये आणि किशोरवयीन मुलांमध्ये टाइप-१ मधुमेहाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. हा आजार चुकीच्या आहारामुळे किंवा जीवनशैलीमुळे होत नाही. हा एक ऑटोइम्यून विकार असून शरीराची प्रतिकारशक्ती स्वादुपिंडातील (पॅन्क्रियाज) इन्सुलिन तयार करणाऱ्या पेशींवरच हल्ला करते. टाइप-१ मधुमेह असलेल्या मुलांना दररोज इन्सुलिन घ्यावे लागते. त्याचबरोबर नियमित रक्तातील साखरेची तपासणी, संतुलित आहार, डॉक्टरांचा सल्ला आणि वैद्यकीय देखरेखीची आवश्यकता असते.

डॉ. सुधा राव पुढे म्हणाल्या की, टाइप-१ मधुमेहाचा उपचार केवळ इन्सुलिन देण्यापुरता मर्यादित नाही. मुलांना आणि त्यांच्या पालकांना दैनंदिन जीवनात हा आजार योग्य प्रकारे कसा हाताळायचा, याचे प्रशिक्षणही द्यावे लागते. मुलांना दिवसातून अनेक वेळा इन्सुलिन घ्यावे लागते, वारंवार रक्तातील साखरेची तपासणी करावी लागते, आहारावर विशेष लक्ष द्यावे लागते आणि नियमितपणे रुग्णालयात येऊन तपासणी करून घ्यावी लागते. लो ब्लड शुगर किंवा डायबेटिक किटोॲसिडोसिससारख्या गंभीर परिस्थितींबाबतही सतर्क राहावे लागते. मात्र, सर्वात मोठे आव्हान उपचार नसून मानसिक आणि भावनिक ताण असतो. मुलाची शाळेत अचानक साखरेची पातळी कमी झाली तर काय होईल, उपचाराचा खर्च कसा भागवायचा आणि मुलाचे भविष्य कसे असेल, अशा अनेक चिंता पालकांना सतावत असतात. त्यामुळे इन्सुलिनबरोबरच योग्य माहिती, मानसिक आधार, सातत्यपूर्ण मार्गदर्शन आणि आपत्कालीन परिस्थितीची तयारीही तितकीच महत्त्वाची आहे.

लहानपणापासूनच मधुमेहावर योग्य नियंत्रण ठेवल्यास ही मुले निरोगी आणि दीर्घायुषी जीवन जगू शकतात. मात्र भारतातील अनेक कुटुंबांसाठी या आजारावरील उपचारांचा आर्थिक बोजा अधिक असतो. एका मुलाच्या उपचारासाठी दरवर्षी सुमारे ७० हजार ते ९० हजार रुपये किंवा त्यापेक्षाही अधिक खर्च येऊ शकतो. यात इन्सुलिन, रक्तातील साखरेच्या तपासण्या, इतर वैद्यकीय चाचण्या, डॉक्टरांचे मानधन, रुग्णालयीन उपचार आणि आधुनिक मधुमेह तंत्रज्ञानाचा खर्च यांचा समावेश असतो. बहुतेक कुटुंबांना हा खर्च स्वतःच्या खिशातून करावा लागतो. काहींना कर्ज घ्यावे लागते, तर काही जण खर्च कमी करण्यासाठी इन्सुलिनचे डोस कमी करतात किंवा उपचार व फॉलो-अप बंद करतात. अनेक कुटुंबांना घरखर्च आणि मुलाचा उपचार यांपैकी एकाची निवड करण्याची वेळ येते असेही डॉ राव यांनी सांगितले.

रुग्णालयाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिनी बोधनवाला म्हणाल्या, टाइप-१ मधुमेह असलेल्या मुलांचे भविष्य नक्कीच उज्ज्वल असू शकते. योग्य उपचार, कुटुंबाचा पाठिंबा आणि नियमित फॉलो-अप यांच्या मदतीने ही मुलेही निरोगी, सक्रिय आणि सर्वसामान्य जीवन जगू शकतात. वाडिया रुग्णालयात दर्जेदार उपचारांसोबत आर्थिक मदतही दिली जाते. तसेच ग्लुकोज मॉनिटर, इन्सुलिन पंप आणि आधुनिक इन्सुलिन डिलिव्हरी प्रणालीसारख्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. याशिवाय डॉक्टरांच्या देखरेखीखाली कृत्रिम बुद्धिमत्तेवर (एआय) आधारित मोबाईल ॲप विकसित करण्यात येत असून, त्याद्वारे मुलांना आणि त्यांच्या कुटुंबियांना सातत्याने मार्गदर्शन आणि मदत उपलब्ध करून दिली जाणार आहे.

तज्ज्ञांच्या मते, टाइप-१ मधुमेहाचे वेळीच निदान, सर्वांसाठी सहज उपलब्ध इन्सुलिन, नियमित उपचार, जनजागृती आणि शाळांमध्ये विशेष व्यवस्था यामुळे या मुलांचे जीवन अधिक सुरक्षित होऊ जीवनाचा दर्जा सुधारता येऊ शकतो. आजाराची सुरुवातीची लक्षणं वेळीच ओळखून त्वरित उपचार सुरू केल्यास अनेक मुलांचा जीव वाचवता येऊ शकतो.