मुंबई : कर्करोगावरील उपचारांचा वाढता खर्च, केमोथेरपी आणि रेडिओथेरपीचे गंभीर दुष्परिणाम तसेच रुग्णांच्या जीवनमानाचा प्रश्न यामुळे जगभरात आरोग्य क्षेत्र नव्या पर्यायांचा शोध घेत आहे. अशा वेळी पुण्याजवळील वाघोली येथे गेल्या तीन दशकांपासून सुरू असलेल्या एका संशोधनाधिष्ठित प्रयोगाने देश-विदेशातील वैद्यकीय क्षेत्राचे लक्ष वेधून घेतले आहे. आधुनिक कर्करोग उपचार आणि आयुर्वेद यांचा समन्वय साधणाऱ्या ‘इंटिग्रेटिव्ह ऑन्कोलॉजी’ या संकल्पनेला भारतात आकार देणारे ज्येष्ठ कर्करोगतज्ज्ञ डॉ. अरविंद विष्णू कुलकर्णी, आयुर्वेदाचार्य डॉ. सदानंद सरदेशमुख आणि भारतीय संस्कृती दर्शन ट्रस्ट यांचे कार्य आज जागतिक स्तरावर चर्चिले जात आहे.
वाघोली येथील ‘इंटिग्रेटेड कॅन्सर ट्रीटमेंट अँड रिसर्च सेंटर’ (आयसीटीआरसी) हा या प्रयोगाचा केंद्रबिंदू आहे. सुमारे ६० एकर परिसरात उभ्या असलेल्या ‘भारतीय संस्कृती दर्शन ट्रस्ट’ या संस्थेच्या या प्रकल्पाने गेल्या तीन दशकांहून अधिक काळात १७ हजारांहून अधिक कर्करोग रुग्णांना उपचार आणि मार्गदर्शन दिल्याचा संस्थेचा दावा आहे. आधुनिक ऑन्कोलॉजी आणि आयुर्वेदाचा वैज्ञानिक पद्धतीने संगम घडवून आणण्याचा हा देशातील पहिल्या प्रयत्नांपैकी एक मानला जातो.
इंटिग्रेटिव्ह ऑन्कोलॉजी म्हणजे आधुनिक वैद्यकाला पर्याय देणारी पद्धत नाही. उलट शस्त्रक्रिया, केमोथेरपी, रेडिओथेरपी आणि इतर आधुनिक उपचारपद्धतींसोबत आयुर्वेदीय उपचारांची शास्त्रीय जोड देण्याची ही संकल्पना आहे. मुळात कर्करोग शरीरात का आणि कसा उदभवतो यावर सध्या जगभर संशोधन चालू आहे. कर्करोगाचे निदान झाल्यानंतर पेशीस्तरावर मुकाबला आधुनिक वैद्यकाद्वारे केला जातो. यात आयुर्वेदाच्या मदतीने रुग्णाची प्रतिकारशक्ती, पचनसंस्था, मानसिक स्थैर्य आणि एकूण जीवनमान सुधारण्याचा प्रयत्न केला जातो.केमोथेरपीमुळे होणारा अशक्तपणा, भूक मंदावणे, मळमळ, थकवा, झोपेच्या समस्या आणि प्रतिकारशक्तीतील घट यांसारख्या तक्रारी कमी करण्यासाठी आयुर्वेदीय औषधे, आहार, जीवनशैलीतील बदल आणि पंचकर्मासारख्या उपचारांचा वापर केला जातो. त्यामुळे रुग्ण उपचार अधिक चांगल्या प्रकारे सहन करू शकतो असा या प्रकल्पाशी संबंधित तज्ज्ञांचा अनुभव आहे.
डॉ. अरविंद कुलकर्णी यांचा प्रवास स्वतःमध्ये प्रेरणादायी मानला जातो. पुण्यातील बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी अमेरिकेत उच्च शिक्षण घेतले. शिकागो, लिव्हरपूल आणि न्यूयॉर्कमधील नामांकित संस्थांमध्ये रेडिएशन ऑन्कोलॉजीचे प्रशिक्षण घेतल्यानंतर ते अमेरिकन बोर्ड प्रमाणित कर्करोगतज्ज्ञ झाले. तदनंतर न्यूयॉर्क विश्वविद्यालयातून त्यांना फेलोशिप इन रेडिएशन अंकोलॉजी ही पदवी पण मिळाली. काही वर्षे अमेरिकेत वैद्यकीय सेवा दिल्यानंतर १९७३ मध्ये ते भारतात परतले आणि जसलोक हॉस्पिटल तसेच बॉम्बे हॉस्पिटलमध्ये रेडिओथेरपी विभागाचे प्रमुख म्हणून कार्यरत राहिले. गेल्या पन्नास वर्षांच्या काळात जवळपास ३५ हजाराहून अधिक कॅन्सर रुग्णांवर त्यांनी मार्गदर्शन आणि उपचार केले.
१९७३ यावर्षी जसलोक हॉस्पिटल मध्ये त्यांच्या उपचाराखाली असलेल्या गर्भाशयाच्या कर्करोगाच्या एका गंभीर स्त्रीरुग्णाला रेडिएशनचा अपेक्षित प्रतिसाद मिळत नव्हता. रुग्णाच्या नातेवाईकांनी मुंबईतील प्रख्यात वैद्य श्रीयुत एस एस भावे यांच्या सल्ल्यानुसार आयुर्वेदीय औषधोपचारांची जोड देण्याची विनंती केली. त्यानंतर रुग्णाच्या प्रकृतीत झालेली लक्षणीय सुधारणा डॉ. कुलकर्णी यांच्यासाठी महत्त्वाचा टर्निंग पॉइंट ठरली. आधुनिक उपचारांसोबत आयुर्वेदाची भूमिका काय असू शकते याचा त्यांनी गंभीरपणे अभ्यास सुरू केला.याच काळात पुण्यात त्यांची १९७५ मध्ये पूज्य प्रभाकर केशव सरदेशमुख महाराज यांच्याशी झालेली भेट या प्रवासातील दुसरा महत्त्वाचा टप्पा ठरली.
भारतीय संस्कृती दर्शन ट्रस्टचे संस्थापक असलेल्या सरदेशमुख महाराजांनी भारतीय ज्ञानपरंपरेचा वैज्ञानिक दृष्टिकोनातून अभ्यास व्हावा यासाठी आयुष्यभर कार्य केले. नाडीपरीक्षा, आयुर्वेदीय उपचार आणि रुग्णनिदानातील त्यांचे परंपरागत कौशल्य पाहून डॉ. कुलकर्णी प्रभावित झाले.सरदेशमुख महाराजांनी आयुर्वेद आणि आधुनिक वैद्यक यांचा समन्वय केवळ श्रद्धेच्या आधारावर नव्हे तर संशोधनाच्या कसोटीवर सिद्ध व्हावा, असा आग्रह धरला. त्यातूनच डॉ. कुलकर्णी आणि डॉ. सदानंद सरदेशमुख यांच्याकडून कर्करोग संशोधनाची संकल्पना १९९४ मध्ये आकाराला आली.
भारतीय संस्कृती दर्शन ट्रस्टच्या माध्यमातून १९९४ मध्ये वाघोली येथे ‘कॅन्सर रिसर्च प्रोजेक्ट’ची स्थापना करण्यात आली. सुरुवातीला मोजक्या साधनसामग्रीसह सुरू झालेला हा उपक्रम पुढे ‘इंटिग्रेटेड कॅन्सर ट्रीटमेंट अँड रिसर्च सेंटर’मध्ये विकसित झाला. आज येथे आयुर्वेद, आधुनिक वैद्यक, संशोधन प्रयोगशाळा, प्रशिक्षण, रुग्ण सल्लामसलत , सर्जरी, रेडिओथेरपी, किमोथेरपी आणि जनजागृती अशा विविध विभागांद्वारे काम केले जाते.संस्थेने आयुर्वेदाधारित उपचारांचा कर्करोग रुग्णांच्या जीवनमानावर होणारा परिणाम, केमोथेरपीचे दुष्परिणाम कमी करण्यातील भूमिका आणि प्रतिकारशक्तीवरील प्रभाव यांचा अभ्यास केला आहे. विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये या संशोधनाची मांडणी करण्यात आली आहे.
आयुष मंत्रालयाची मान्यता
वाघोलीतील या प्रकल्पाला २०१० यावर्षी केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाकडून ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’चा दर्जा मिळाला आहे. त्याचप्रमाणे इंडियन कॅन्सर सोसायटीची मान्यता मिळालेली आहे. कर्करोग क्षेत्रातील समन्वित उपचार आणि संशोधनासाठी कार्य करणाऱ्या देशातील मोजक्या संस्थांमध्ये ‘आयसीटीआरसी’ ची गणना होते. संस्थेने देश-विदेशातील संशोधक, डॉक्टर आणि आयुर्वेदतज्ज्ञ यांना एकत्र आणण्यासाठी आंतरराष्ट्रीय परिषदांचे सन १९९७ पासून ते आज तागायत नियमितपणे आयोजनही केले आहे. संस्थेकडे महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यांमधून रुग्ण उपचारासाठी येतात. अनेक रुग्ण केमोथेरपी किंवा रेडिओथेरपीसोबत पूरक आयुर्वेदीय उपचार घेतात. उपचारांमुळे रोग पूर्णपणे बरा होतो, असा दावा संस्था करत नसली तरी जीवनमान सुधारण्यास, दुष्परिणाम कमी करण्यास आणि रुग्णाला उपचार प्रक्रियेत अधिक सक्षम बनविण्यास मदत होत असल्याचे डॉ अरविंद कुलकर्णी व डॉ सदानंद सरदेशमुख यांनी सांगितले.
या प्रकल्पात आधुनिक संशोधन निकषांचे काटेकोर पालन करण्यात आले, ज्यामुळे या कार्याला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर विश्वासार्हता मिळाली.डॉ. कुलकर्णी यांनी मध्यंतरी दोन वर्षे अमेरिकेतील पिट्सबर्ग येथील अॅलेघेनी जनरल हॉस्पिटलमध्ये ‘इंटिग्रेटिव्ह मेडिसिन’चे पहिले वैद्यकीय संचालक म्हणूनही काम केले आहे. गेली तीन दशके वाघोली येथील संशोधन कार्यात त्यांनी स्वत:ला वाहून घेतले आहे. याबरोबरच डॉक्टर कुलकर्णी यांनी मुंबईतील इंडियन कॅन्सर सोसायटीचे लेडी रतन टाटा मेडिकल सेंटर, पुणे येथील रुबी हॉल हॉस्पिटल, लोकमान्य हॉस्पिटल इत्यादी संस्था मध्ये कन्सल्टंट रेडिएशन अन्कॉलॉजिस्ट म्हणूनही काम केले आहे.
भारतीय संस्कृती दर्शन ट्रस्टचे व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. सदानंद सरदेशमुख यांना कर्करोग क्षेत्रातील आयुर्वेदीय योगदानाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘धन्वंतरी पुरस्कार’ प्रदान करण्यात आला आहे. कर्करोग उपचारात रुग्णकेंद्रित, सुरक्षित आणि परवडणाऱ्या पर्यायांचा शोध जगभर सुरू असताना पुण्यात विकसित झालेली ही समन्वित उपचारपद्धती भविष्यातील आरोग्य व्यवस्थेसाठी एक महत्त्वाचा मार्गदर्शक ठरू शकते. आयुर्वेद हे भारताचे प्राचीन आरोग्यशास्त्र आहे, नुसते रोग शास्त्र नाही. कुठलाही रोग सुरु होण्याच्या अगोदरच त्याचा प्रतिबंध कसा करता येईल याचा विचार प्रामुख्याने आयुर्वेद करतो. कालमानाप्रमाणे योग्य ते आधुनिक बदल करण्यास आयुर्वेद सक्षम आहे. आयुर्वेद हे गतिशील गहन शास्त्र आहे. आधुनिक विज्ञान आणि भारतीय परंपरेचा संगम साधणारे हे मॉडेल आता जागतिक वैद्यकीय क्षेत्रात चर्चेचा विषय बनले आहे.
कर्करोगाचे वाढते प्रमाण, उपचारांचा वाढता आर्थिक बोजा आणि रुग्णकेंद्रित आरोग्यसेवेची गरज यामुळे जगभर ‘इंटिग्रेटिव्ह मेडिसिन’कडे लक्ष वेधले जात आहे. अमेरिकेतील अनेक कर्करोग केंद्रांमध्ये योग, ध्यान, पोषणशास्त्र आणि पूरक उपचारांचा वापर वाढत असताना पुण्यातील वाघोली येथे आयुर्वेद आणि आधुनिक ऑन्कोलॉजीचा समन्वय साधणारे मॉडेल गेल्या तीन दशकांपासून कार्यरत आहे.भारतीय परंपरेतील ज्ञान आणि आधुनिक विज्ञान यांचा सेतू बांधण्याचा प्रयत्न म्हणून या प्रकल्पाकडे पाहिले जाते. केंद्र सरकारने भारतीय नागरिकांना आयुर्वेदाचा योग्य तऱ्हेने उपयोग करण्यासाठी उत्तेजन द्यावे यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न चालू आहेत.
या प्रकल्पामुळे संबंधित डॉक्टर, वैद्य, शास्त्रज्ञ यांची एक मोठी टीम तयार झालेली आहे. त्याचप्रमाणे असंख्य रुग्णांना फायदा मिळाल्यामुळे समाजाचा दृष्टिकोनही आयुर्वेदाबद्दल बदलत आहे. जागतिक कीर्तीच्या अनेक शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन वेळोवेळी लाभल्यामुळे या प्रकल्पाची योग्य ती प्रगती होत आहे. यामध्ये प्रामुख्याने डॉक्टर के. बी. ग्रँट, आर. डी. लेले, वैद्य श्रीराम शर्मा, सुधा गांगल, विद्या गुप्ता, शुभदा चिपळूणकर, निशिगंधा नाईक, भूषण पटवर्धन इत्यादी अनेक शास्त्रज्ञांची गणना करावी लागेल. या प्रकल्पाचे पुढील कार्य जोमात सुरू राहण्यासाठी नवीन पिढी कार्यरत आहे. त्यामध्ये प्रमुखतः वैद्य विनिता देशमुख, सुश्रुत सरदेशमुख, सुकुमार सरदेशमुख, वासंती गोडसे, श्रीनिवास दातार, श्वेता गुजर, भाग्यश्री सरदेशमुख, निलांबरी सरदेशमुख , संदीप चव्हाण आणि महाराष्ट्रातील प्रमुख शहरात हे कार्य करणाऱ्या अनेक वैद्यकीय शास्त्रज्ञांचा उल्लेख करावा लागेल. त्याचप्रमाणे वाघोली येथील केंद्रामध्ये आधुनिक उपचार करणारे तज्ञ म्हणून डॉक्टर तुषार पाटील, जगदीश शिंदे अभिषेक पूरकायस्थ, राकेश नेवे आणि त्यांचे सर्व सहकारी यांचा प्रमुख वाटा आहे.
कर्करोग उपचारातील रुग्णाला अधिक चांगले जीवनमान देणाऱ्या पूरक उपचारपद्धतीचा वैज्ञानिक अभ्यास म्हणून वाघोलीचे मॉडेल आज राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चेचा विषय बनले आहे. या संशोधन प्रकल्पातून अनेक आयुर्वेदिक नवोदित डॉक्टरांना प्रेरणा मिळाली आहे. त्यांचा आयुर्वेदासंबंधी आत्मविश्वास वाढत आहे. त्याचप्रमाणे आधुनिक ॲलोपॅथिक डॉक्टरांचा, तज्ञांचा आणि शास्त्रज्ञांचा या संशोधनामुळे इंटिग्रेटेड मेडिसिन विषयी दृष्टिकोन सुधारत आहे.
