scorecardresearch

हार्बर रेल्वेवरील झटपट प्रवासासाठी प्रतीक्षा

लोकल फेऱ्यांची संख्या वाढावी, त्यांचे वेळापत्रक आणखी अचूक व्हावे आणि प्रवाशांच्या झटपट प्रवासासाठी मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावर अत्याधुनिक डिजिटलाईज्ड सीबीटीसी (कम्युनिकेशन बेस ट्रेन कंट्रोल सिस्टिम) सिग्नल यंत्रणा बसविली जाणार आहे.

अत्याधुनिक सीबीटीसी सिग्नल यंत्रणेचा अहवाल मार्च महिन्यात, पुढील वर्षांपासून कामाला सुरुवात

मुंबई: लोकल फेऱ्यांची संख्या वाढावी, त्यांचे वेळापत्रक आणखी अचूक व्हावे आणि प्रवाशांच्या झटपट प्रवासासाठी मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावर अत्याधुनिक डिजिटलाईज्ड सीबीटीसी (कम्युनिकेशन बेस ट्रेन कंट्रोल सिस्टिम) सिग्नल यंत्रणा बसविली जाणार आहे. प्रथम सीएसएमटी ते पनवेल हार्बर मार्गावर ही यंत्रणा बसवण्याचा निर्णय मुंबई रेल्वे विकास महामंडळाने (एमआरव्हीसी) घेतला आहे. मात्र करोना, टाळेबंदी, कमी मनुष्यबळ आणि यंत्रणेच्या अंमलबजावणीसाठी सल्लागार कंपनीची नियुक्ती करण्यास झालेला विलंब यामुळे प्रकल्पाचा अहवाल पुढील महिन्यात सादर होईल, अशी माहिती एमआरव्हीसीने दिली.  त्यानंतरच या कामासाठी निविदा काढण्यात येणार असून त्यासाठी तीन ते चार महिने लागतील. या प्रकल्पाच्या कामाला प्रत्यक्षात पुढील महिन्यापासून सुरुवात होईल.

मध्य रेल्वे मुख्य मार्ग आणि हार्बर, तसेच ठाणे ते पनवेल ट्रान्स हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर सध्या डिजीटलाईज्ड सिग्नल यंत्रणा नाही. मानवी पद्धतीने यंत्रणा हाताळताना अनंत अडचणींचा सामना रेल्वेला करावा लागतो. त्यातच अपघाताचा धोकाही संभवतो. सातत्याने सिग्नल यंत्रणेत बिघाड होत असल्याने लोकलचे वेळापत्रकही बिघडते. शिवाय लोकल फेऱ्या वाढवण्यातही अडचणी येतात. या कारणांमुळे मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावर अत्याधुनिक सीबीटीसी यंत्रणेची अंमलबजावणी करण्याचा निर्णय पाच वर्षांपूर्वी घेतला. चर्चा, प्रस्ताव तयार करणे, रेल्वे बोर्ड मंजुरी इत्यादींमध्येच हा प्रस्ताव रखडला होता. अखेर ‘एमयूटीपी ३’मध्ये याचा समावेश करुन २०१९-२० च्या अर्थसंकल्पात त्याला मंजुरी देण्यात आली. मध्य रेल्वेवर सीएसएमटी ते कल्याण, हार्बरवर सीएसएमटी ते पनवेल आणि पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते विरार मार्गावर हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. हा प्रकल्प प्रथम सीएसएमटी ते पनवेल हार्बर मार्गावर राबवण्यात येणार आहे.

हार्बरवर हा प्रकल्प राबवण्याठी व त्याचा अभ्यास करण्यासाठी सल्लागार नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु करोना, टाळेबंदीमुळे त्याच्या प्रक्रियेला विलंब झाला. त्यानंतर २०२० च्या अखेरीस सल्लागाराची नियुक्ती करण्यात आली. ऑगस्ट २०२१ पर्यंत सल्लागाराकडून अहवाल सादर केला जाणार होता. त्यालाही विलंब झाला. त्यानंतर डिसेंबर २०२१ पर्यंत सादर होणाऱ्या अहवालाची अंतिम मुदत २०२२ च्या सुरुवातीपर्यंत पुढे ढकलण्यात आली. आता पुढील महिन्यात तो सादर केला जाईल, अशी माहिती एमआरव्हीसीचे व्यवस्थापकीय संचालक रवी अग्रवाल यांनी दिली. त्यानंतर निविदा प्रक्रिया राबवली जाणार आहे. प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम पुढील वर्षांपासून सुरु केले जाईल. प्रकल्प दोन ते तीन वर्षांत पूर्ण होणार आहे. सीबीटीसी यंत्रणा प्रथम सीएसएमटी ते पनवेल हार्बर मार्गावर होणार असून त्याचा खर्च १ हजार ३९१ कोटी रुपये आहे. मुंबई पालिका, सिडको, मुंबई महानगर विकास प्राधिकरणकडून पाच टक्के  इतका खर्च वसूल करतानाच रेल्वे व राज्य सरकारकडूनही निधी मिळेल.

सीबीटीसी म्हणजे काय?

ही सिग्नल यंत्रणा डिजिटल असेल. यात मोटरमनला बसल्या जागी वेगासंबंधात नियंत्रण कक्षाकडून सिग्नलद्वारे झटपट सूचना मिळतील. तसेच, पुढे धावणाऱ्या लोकल गाडय़ांसंदर्भातही सिग्नल मिळेल. यामुळे लोकल वेळेत धावतील. तसेच, लोकल फेऱ्यांची संख्याही वाढण्यास मदत मिळेल. सध्या दर चार मिनिटांनी लोकल सुटते. ती वेळ दोन मिनिटांनंतर येईल. त्यामुळे लोकल फेऱ्याही ४० ते ५० टक्क्यांनी वाढतील.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Waiting instant ride harbor railway ysh

ताज्या बातम्या