मंगल हनवते

मुंबई : मुंबई ते पुणे प्रवास वेगवान करण्यासाठी, २५ ते ३० मिनिटांची बचत करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) खोपोली ते कुसगाव अशी १९.८० किमीची नवीन मार्गिका बांधण्यात येत आहे. मात्र, जून २०२३ मध्ये ही मार्गिका वापरात आणण्याचे नियोजन कोलमडले असून आतापर्यंत प्रकल्पाचे केवळ ४० टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम पूर्ण होण्यास मार्च २०२४ उजाडणार असल्याची माहिती एमएसआरडीसीने दिली.

Mumbai, tenders, projects,
मुंबई : तीन प्रकल्पांसाठी ८२ निविदा, आचारसंहितेनंतरच अंतिम निर्णयाची शक्यता
Mega block on Central Harbour and Trans Harbour route
मुंबई : मध्य, हार्बर, ट्रान्स हार्बर मार्गावर मेगाब्लॉक
Railway megablock
रेल्वेचा पुन्हा मेगाब्लॉक! जाणून घ्या कोणत्या गाड्या रद्द अन् कोणत्या उशिरा धावणार…
Passengers are monitored through cameras based on AI technology in Pune railway station
सावधान! रेल्वे प्रवाशांवर ‘एआय’ कॅमेऱ्यांची नजर; संशयास्पद हालचाली टिपल्या जाताहेत

मुंबई ते पुणे द्रुतगती मार्गामुळे मुंबई-पुणे अंतर कमी झाले असून प्रवास वेगवान झाला. मात्र द्रुतगती मार्गावरील आडोशी बोगद्याजवळ मुंबई ते पुणे द्रुतगती मार्ग (६ मार्गिका) आणि राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ (४ मार्गिका) एकत्र येतात आणि खंडाळा एक्झिट येथे वेगळे होतात. आडोशी बोगदा ते खंडाळा एक्झिट यादरम्यान घाट आणि चढ उताराचे प्रमाण जास्त असून येथे दरडी कोसळण्याचे प्रकार घडतात. त्यातच पावसाळय़ात डोंगरालगतची एक मार्गिका वाहतुकीसाठी बंद ठेवावी लागते. त्यामुळे वाहतूक कोंडी होते. या सर्व बाबींचा विचार करून एमएसआरडीसीने खोपोली ते कुसगाव अशी नवी मार्गिका बांधण्याचा निर्णय घेतला. फेब्रुवारी २०१९ मध्ये दोन टप्प्यांत या प्रकल्पाच्या कामाला सुरूवात झाली असून यासाठी ६६९५.३७ कोटी रुपये असा खर्च अपेक्षित आहे. महत्त्वाकांक्षी असा हा प्रकल्प डिसेंबर २०२२ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र करोना, टाळेबंदीचा फटका या प्रकल्पाला बसला आणि प्रकल्प पूर्णत्वाचा मुहुर्त जून २०२३ वर गेला. मात्र आता पुन्हा एकदा या प्रकल्पाला मुदतवाढ द्यावी लागली आहे.

त्यानुसार आता जून २०२३ ऐवजी मार्च २०२४ मध्ये हा प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. आतापर्यंत एकूण प्रकल्पाचे ४० टक्के काम पूर्ण झाले आहे.  पहिल्या टप्प्यातील १२.४३ किमीच्या रस्त्याचे ४३.२ टक्के तर दुसऱ्या टप्प्यातील ७.४१ किमीच्या रस्त्याचे २८.४९ टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती एमएसआरडीसीने दिली.

या प्रकल्पात दोन बोगदे असून १६८० किमीच्या पहिल्या बोगद्यातील डाव्या बाजूचे ५९५ मीटरचे तर उजव्या बाजूचे ५७२ मीटरचे काम पूर्ण झाले आहे. ८८७० मीटरच्या दुसऱ्या बोगद्याच्या डाव्या बाजूचे ५४८६ मीटरचे तर उजव्या बाजूचे ५७१५ मीटरचे काम पूर्ण झाले आहे. कामाची ही आकडेवारी लक्षात घेता जून २०२३ मध्ये काम पूर्ण होणे अशक्य आहे. त्यामुळे आता प्रकल्पाच्या पूर्णत्वास एमएसआरडीसीकडून मुदतवाढ देण्यात आली आहे.

प्रकल्पाचे वैशिष्टय़ काय?

या मार्गिकेमुळे खोपोली ते कुसगाव दरम्यानचा मार्ग आता सहाऐवजी आठ पदरी होणार आहे. याच प्रकल्पांतर्गत दोन बोगदेही बांधण्यात येत आहेत. त्यामुळे हा प्रकल्प पूर्ण झाल्यास मुंबई ते पुणे प्रवासाचे अंतर २५ ते ३० मिनिटांनी कमी होणार आहे.