Waiting traffic police interceptor vehicles proposals no decision state government Mumbai print news ysh 95 | Loksatta

मुंबई : वाहतूक पोलीस इंटरसेप्टर वाहनांच्या प्रतीक्षेत; प्रस्ताव धुळखात, राज्य सरकारकडून अद्याप निर्णय नाही

वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या बेशिस्त वाहनचालकांना लगाम घालण्यासाठी राज्यातील वाहतूक पोलिसांना आणखी १९४ इंटरसेप्टर वाहनांची गरज आहे.

traffic police interceptor vehicles
(फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

मुंबई: वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या बेशिस्त वाहनचालकांना लगाम घालण्यासाठी राज्यातील वाहतूक पोलिसांना आणखी १९४ इंटरसेप्टर वाहनांची गरज आहे. मात्र करोनाकाळापासून रखडलेला याबाबतचा प्रस्ताव अद्यापही पुढे सरकू शकलेला नाही. त्यामुळे अत्यंत कमी इंटरसेप्टर वाहनांद्वारे नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याचे काम वाहतूक पोलिसांना करावे लागत असून वाहतूक पोलीस इंटरसेप्टर वाहनांच्या प्रतीक्षेत आहेत.

महाराष्ट्रात अपघाती मृत्युंचे प्रमाण मोठे आहे. वाहनचालकांचा बेशिस्तपणा हे अपघातांचे प्रमुख कारण आहे. वाहनचालक महामार्गावर वेगमर्यादेचे उल्लंघन करून भरधाव वेगात वाहने चालवितात. वेगमर्यादेच्या उल्लंघनामुळे गंभीर स्वरूपाचे अपघात घडतात. अनेक वाहनचालक मद्यपान करून वाहने चालवितात. त्यामुळेही अपघाताना आमंत्रण मिळते. महामार्ग असो वा अन्य रस्ते वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर कठोर कारवाई करण्यासाठी वाहतूक पोलिसांना इंटरसेप्टर वाहने उपलब्ध करण्यात आली आहेत. राज्यातील मुंबई, नवी मुंबईसह अन्य शहर पोलिसांनाही ही वाहने उपलब्ध करण्यात आली आहेत. तसेच महामार्ग वाहतूक पोलिसांकडेही इंटरसेप्टर वाहने आहेत.

हेही वाचा >>> मुंबई : नायगाव स्थानकात क्रेनची लोकलला धडक, मोठी दुर्घटना टळली, मोटरमन जखमी

राज्यातील वाहतूक पोलिसांकडे सध्या ९६ इंटरसेप्टर वाहने असून यापैकी ६२ वाहने महामार्ग वाहतूक पोलिसांकडे आहेत. या वाहनांमध्ये स्पीडगन ठेवण्याची सुविधा (ट्रायपॉड) आहे. त्यामुळे ऊन-वारा, पावसाचा परिणाम पोलिसांच्या स्पीडगन कारवाईवर होत नाही. याशिवाय कारवाईसाठी सीसी टीव्ही कॅमेरे, ब्रीद अ‍ॅनलायझर, इ-चलान यंत्रणाही आहे. राज्यातील वाहतूक पोलिसांना आणखी १९४ इंटरसेप्टर वाहनांचीही गरज असून त्याबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारकडे सादर करण्यात आला आहे. मात्र त्यावर विचारविनिमय झालेला नाही. करोनाकाळात हा प्रस्ताव रखडला. त्याचा अद्यापही विचार झाला नसल्याची माहिती वाहतूक पोलीस दलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

हेही वाचा >>> ‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’ मार्गिकांना मुंबईकरांची पसंती

सध्या या वाहनांच्या कमतरतेमुळे समृद्धी महामार्गावर कारवाई करताना अडचणी येतात. समृद्धी महामार्गावर  वाहतूक नियोजन आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यासाठी नागपूर, औरंगाबाद, पुणे विभागातील वाहतूक पोलिसांवर तात्पुरती जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांचा ताफ्यातील लेझर स्पीड गन, अल्कोहोल ब्रेथ अ‍ॅनलायझर यासह अन्य यंत्रणा असलेल्या आठ इंटरसेप्टर वाहनांचा कारवाईसाठी वापर केला जात आहे. समृद्धी महामार्ग महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारित असल्याने महामार्ग वाहतूक पोलिसांनी आणखी १५ इंटरसेप्टर वाहनांची मागणी महामंडळाकडे केली आहे. त्याला महामंडळानेही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-01-2023 at 14:43 IST
Next Story
“दुर्दैवाने राजकारणाप्रमाणेच हे बेकायदेशीर राज्यसरकार…” आदित्य ठाकरेंचा शिंदे-फडणवीस सरकारला टोला!