मुंबई : वानखेडे स्टेडियमवर आयोजित करण्यात आलेल्या ड्रोन शोदरम्यान नियंत्रण सुटल्याने दोन ड्रोन चर्चगेट रेल्वे स्थानकात कोसळल्याची घटना घडली. २८ ऑक्टोबर रोजी रात्री सुमारे ८.१० वाजता फलाट क्रमांक तीनवर हा प्रकार घडला. यातील एका ड्रोनची धडक लागल्याने फलाटावर उभे असलेले हेमंत प्रकाश महोत्सवकर (३७) जखमी झाले. त्यांच्या डोक्याला दुखापत होऊन रक्तस्राव झाला.
वानखेडे स्टेडियमवर जिओ प्लॅटफॉर्म्सच्या समभागविक्रीच्या निमित्ताने ड्रोन शो आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमातील दोन ड्रोन नियंत्रणाबाहेर गेल्याने ते जवळच असलेल्या चर्चगेट रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक तीनवर कोसळले. त्या वेळी महोत्सवकर हे फलाटावर विरारच्या दिशेकडील टोकाजवळ उभे होते. त्यांच्यावर एक ड्रोन आदळल्याने त्यांच्या डोक्याला दुखापत झाली.
घटनेची माहिती मिळताच रेल्वे सुरक्षा कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. जखमी प्रवाशाला रुग्णवाहिकेतील डॉक्टरांकडून प्राथमिक उपचार देण्यात आले. सुरुवातीला त्यांनी घरी जाण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, काही वेळाने पुढील उपचारांची गरज असल्याचे सांगितल्यानंतर त्यांना रात्री सुमारे ९.११ वाजता रुग्णवाहिकेतून जी. टी. रुग्णालयात हलविण्यात आले.
दरम्यान, चर्चगेट लोहमार्ग पोलिसांनी घटनास्थळावरून दोन्ही ड्रोन ताब्यात घेतले आहेत. या प्रकरणी अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ड्रोनचा ताबा सुटण्यामागे तांत्रिक बिघाड होता की संचालनातील निष्काळजीपणा, तसेच ड्रोन शोसाठी आवश्यक सुरक्षा नियमांचे पालन करण्यात आले होते का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
