वैधमापनशास्त्र विभागाची तिघांवर कारवाई

पोलिसांच्या वैधमापनशास्त्र विभागाने मंगळवारी वानखेडे स्टेडियमवर अचानक भेट देऊन छापील किमतीपेक्षा जास्त दराने आइसक्रीम विकणाऱ्या तीन विक्रेत्यांविरोधात कारवाई केली. या कारवाईनंतर विभागाने भारतीय क्रिकेट नियामक मंडळ व मुंबई क्रिकेट असोसिएशनला कारणे दाखवा नोटीस जारी करून खुलासा करण्यास सांगितले आहे.

मंगळवारी वानखेडेवर आयपीएल सामना सुरू होता. तेव्हा अचानक दिलेल्या भेटीत वैधमापनशास्त्र विभागाच्या अधिकाऱ्यांना गरवारे प्रेक्षागृहात मेसर्स दाणा पाणी मॅग्नम कँडी आइसक्रीम छापील किमतीपेक्षा २५ रुपये जादा दर आकारून विकत असल्याचे आढळले.

तर गावस्कर स्टॅण्ड येथील दोन स्टॉलवरून कॉर्नेटो आइसक्रीम पाच रुपये महाग विकल्याची माहिती मिळाली. त्यानुसार या तिघांविरोधात गुन्हा नोंदवून खटले भरण्यात आल्याची माहिती विभागाचे नियंत्रक अमिताभ गुप्ता यांनी दिली.

राज्यातील कोणत्याही स्टेडियमवर अशा प्रकारे फसवणूक होत असल्यास तातडीने वैधमापनशास्त्र नियंत्रण कक्षाला ०२२ २२६२२०२२ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन अमिताभ गुप्ता यांनी केले आहे.

बीसीसीआय, एमसीएला नोटीस

सामन्यांदरम्यान ग्राहकांची फसवणूक होऊ नये म्हणून भारतीय क्रिकेट नियामक मंडळ व मुंबई क्रिकेट असोसिएशनने अनुपालन अधिकारी नेमून देखरेख ठेवू, फसवणूक होत असेल तर रोखू, असे आश्वासित केले होते. त्या पाश्र्वभूमीवर अनुपालन अधिकाऱ्यांनी काय केले, याचा खुलासा करा आणि भविष्यात असे प्रकार होणार नाहीत यासाठी काय कराल, अशी विचारणा करणारी नोटीस पोलिसांच्या वैधमापनशास्त्र विभागाकडून जारी करण्यात आली आहे.