उपनगरीय रेल्वे मार्गावर अपघातांचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी रेल्वे प्रशासन अपयशी ठरत असल्याने अपघात कमी करण्यासाठी पश्चिम रेल्वेने थेट प्रवाशांना सल्ला, सूचना देण्याचे आवाहन शनिवारी पश्चिम रेल्वेने केले. रेल्वे अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी रेल्वेकडून एक समिती स्थापन करण्यात आली आहे. यात प्रवाशांकडून सूचना मागवण्याचा निर्णय घेण्यात आला.

याशिवाय या समितीत महापालिका, बेस्ट आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आदी संस्थांनाही समितीत सामावून घेण्याचा रेल्वेचा मानस असल्याचे पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्याने सांगितले.
भावेश नकाते प्रकरणानंतर रेल्वे प्रशासानाला धारेवर धरण्यात आल्याने रेल्वे बोर्डाने पश्चिम आणि मध्य रेल्वेला सुरक्षित प्रवासासंदर्भात समिती स्थापन करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पश्चिम रेल्वेने स्थापन केलेल्या समितीची शनिवारी बठक घेण्यात आली.
या बैठकीत स्वयंसेवी संस्था, प्रवासी संघटना आणि प्रवाशांकडून सूचना मागवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी इच्छुकांनी suggestionswr@gmail.com या संकेतस्थळावर सूचना देण्याचे आवाहन समितीने केले. यावेळी पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक जी. सी. अग्रवाल, खासदार राहुल शेवाळे, प्रवासी संघटनेचे कैलाश वर्मा यांसह रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.