मुंबई: पक्ष आणि चिन्ह यावर दावा सांगण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या शरद पवार गट आणि अजित पवार गटामध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. विधिमंडळातील सदस्य संख्येच्या आधारे पक्ष आणि चिन्ह आपल्यालाच मिळणार असल्याचा विश्वास राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अजित पवार गटाचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केला आहे. तर पक्ष, संघटना पातळीवर पदाधिकारी यांनी निवडणूक प्रक्रियेने केलेल्या अध्यक्ष निवडीविषयी सर्वोच्च न्यायालयाच्या अलिकडील निकालाच्या आधारे पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला मिळणार नाही, असे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्ट केले. केंद्रीय निवडणूक आयोगापुढे सहा ऑक्टोबरला राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आणि पक्षाचे चिन्ह याबाबत सुनावणी होणार आहे. आम्हाला बहुसंख्य आमदारांचा पाठिंबा असून नागालँडमधील आमदारांचेही समर्थन असल्याचा दावा अजित पवार गटाने केला आहे. आमच्याबरोबर संसद व विधिमंडळ सदस्यांबरोबर पक्षाचे राज्यातील आणि अन्य राज्यातील पदाधिकारीही असल्याचा शरद पवार गटाचाही दावा आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार हेच असून त्यांनी घेतलेले निर्णय कोणालाही डावलता येणार नाहीत. पवार यांची निवड पक्षाच्या घटनेतील तरतूदीला अनुसरून झाली आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार पक्ष आणि चिन्ह आमचेच राहणार आहे, असा दावा आमदार आव्हाड यांनी केला आहे.