मुंबईच्या नाक्यांवर परराज्यातून आलेल्या विक्रेत्यांची गजबज

मुंबई : मुंबईत नोव्हेंबरमध्ये थंडीची चाहुल लागते आणि भारतात वास्तव्यास असलेले तिबेटी नागरिक मुंबईत स्वेटर विक्रीसाठी येतात. यंदाही ते स्वेटर, शाली, कानटोप्या, मफलर आदी उबदार कपडय़ांच्या विक्रीसाठी मुंबईत डेरेदाखल झाले आहेत. मात्र उबदार कपडय़ांना मागणीच नसल्याने त्यांचे डोळे ग्राहकांकडे लागले आहेत.

दिवाळीनंतर अवघ्या काही दिवसांनी या विक्रेत्यांनी मुंबईत तळ ठोकला. नोव्हेंबरअखेरी थंडी पडेल असा अंदाज बांधून ते आले होते. परंतु बदलत्या हवामानामुळे उकाडा अधिकच वाढल्याने या विक्रेत्यांचा हिरमोड झाला. डिसेंबरमध्ये थंडी पडली तरच व्यवसाय होईल, अशी अपेक्षा या विक्रेत्यांनी व्यक्त केली.

‘हिवाळय़ात मुंबईत येण्यासाठी चार महिन्याचे घराचे भाडे, जेवणाचा खर्च, सोबत आणलेल्या मदतनीसाचा पगार आदी खर्च भागविण्यासाठी उबदार कपडय़ांची विक्री होणे गरजेचे आहे. मात्र गेल्या दहा दिवसात फारसे ग्राहक फिरकले नाहीत. मध्ये दोन दिवस पाऊस पडल्याने चिंता अधिक वाढली. पुन्हा उकाडा वाढला तर याही महिन्यात कपडय़ांची विक्री होणार नाही’, अशी खंत परळ येथील विक्रेत्या केसा यांनी व्यक्त केली.

फरच्या टोप्यांना विशेष मागणी

शाल, स्वेटर, मफलर, कानटोप्या असे कपडे त्यांच्याकडे उपलब्ध आहेत.  वेगवेगळय़ा नक्षीदार शाल, फरच्या टोप्यांना विशेष मागणी आहे.

गेल्यावर्षी करोनामुळे मुंबईत येऊ शकलो नाही. त्यामुळे आर्थिक चणचण दूर करण्याच्या दृष्टीने यंदा मोठय़ा प्रमाणात व्यवसाय होणे गरजेचे आहे. त्याच अपेक्षेने आम्ही मुंबईत आलो आहोत. सध्या मुंबईबाहेर जाणारा ग्राहक खरेदी करत आहे. अद्याप मुंबईकरांची खरेदी सुरू झालेली नाही. आमच्या व्यवसायाचे गणित निसर्गावर अवलंबून असल्याने मुंबईत छान थंडी पडावी एवढीच प्रार्थना.

कर्मा, विक्रेत्या

विक्रेते कोण?

कर्नाटक राज्यात स्थायिक झालेले तिबेटियन वंशाचे नागरिक दरवर्षी दिवाळी झाली की मुंबईत दाखल होतात. साधारण नोव्हेंबरमध्ये गुलाबी थंडी जाणवू लागली की या विक्रेत्यांचा मोठा समूह मुंबईत येतो. मुंबईत कुर्ला, चेंबूर, परळ, फोर्ट, डोंगरी, घाटकोपर अशा विविध भागांतील मोक्याच्या नाक्यांवर हे विक्रेते कपडय़ांची विक्री करतात. त्याच परिसरात चार महिन्यांसाठी घर भाडय़ाने घेऊन ते वास्तव्य करतात. पंजाबमधील लुधियानामधून हे उबदार कपडे मोठय़ा प्रमाणात खरेदी करून ते मुंबईत विक्रीसाठी आणले जातात.