मुंबई : वाशिम जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाशिम जिल्ह्यातील कारंजा, मंगरूळपीर, मनोरा भागातील विविध संस्था, समित्यांच्या पदाधिकाऱ्यांसह वेगवेगळ्या पक्षांच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यासह आमदार शामभाऊ खोडे, सईताई डहाके, भाजपा जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम चितलांगे आधी उपस्थित होते.
सामाजिक जाण आणि अनुभव असणारा प्रत्येक कार्यकर्ता भाजपात दाखल होत आहे आणि त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ दिला जाणार नाही, अशी ग्वाही चव्हाण यांनी यावेळी दिली.
यावेळी कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती महादेवराव काकडे, उपसभापती गोवर्धन चव्हाण, शिवसेना माजी जिल्हाप्रमुख विजय खानजोळे, पंचायत समितीचे माजी सभापती भास्कर शेगीकर, जिल्हा परिषद माजी सदस्य भाऊराव नाईक, राष्ट्रवादी काँग्रेसचे पांडुरंग कोठाळे, सचिन डाफेकर, विश्वासभाऊ गोदमले, एन.डी. राठोड, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी संचालक आणि राज्य मार्केटिंग फेडरेशनचे संचालक सुरेश गावंडे, जिल्हा परिषद माजी सदस्य उमेश पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि राष्ट्रवादी आणि शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला.
