टिटवाळा येथील गणेशमंदिरातील तलावातील मासे मोठय़ा संख्येने मेल्यानंतर दुसऱ्या दिवशी पुण्यातील पालिका उद्यान तलावातील मासेही पाण्यावर तरंगताना आढळले. या दोन्ही घटनांमागे तापमान व कचरा ही दोन प्रमुख कारणे असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली.
उन्हाळा आला की शहर किंवा शहराजवळच्या भागांमधील तळ्यातील मासे मोठय़ा प्रमाणावर मरून पडलेले दिसतात.
यामागे दोन कारणे आहेत. पहिले कारण म्हणजे पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते. पाण्यात विरघळलेल्या ऑक्सिजनवर मासे जगतात. उन्हाळ्यात वाढत्या तापमानासोबत पाण्यात विरघळणाऱ्या ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते. त्यामुळे माशांना प्राणवायू अपुरा पडतो. त्यातच शहरात तलावात निर्माल्य, कचरा टाकला जातो. यामुळे पाण्यातील शेवाळाला आवश्यक ते खत मिळून त्यांची मोठय़ा प्रमाणात वाढ होते. रात्री या हरित वनस्पतींकडून पाण्यातील ऑक्सिजन वापरला जातो.
आधीच पाण्यात कमी असलेला ऑक्सिजन वनस्पतींकडून वापरला गेल्याने मासे तडफडून मरतात, अशी माहिती सागरी जीवअभ्यासक डॉ. विनय देशमुख यांनी दिली.
शेवाळ हे एकपेशीय असल्याने सर्वबाजूने ऑक्सिजन ओढून घेण्याची त्याची क्षमता असते. त्यातुलनेत शरीरापेक्षा कल्ल्यांचा आकार कमी असलेल्या माशांना ऑक्सिजन शोषून घेण्याच्या स्पर्धेत हार मानावी लागते.
उन्हाळ्यातील तापमान कमी करता येणार नसले तरी तलावात कचरा टाकणे थांबवता येते. मानवी वस्तीपासून दूर असलेल्या तलावांमधील जलचरांना उन्हाळ्यातही फारसा त्रास होत नसल्याचे दिसते, असे डॉ. देशमुख म्हणाले.